राष्ट्राबद्दल प्रेम भावना, निकोप समाज निर्मितीचे बाळकडू म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. मनिष करंजे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त “आजचा युवक आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात संपन्न झाले.

सर्व प्रथम बी.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षातील रिद्धी कापडे या विद्यार्थ्यांनीने राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्ष्यगीताचे गायन केले. तद्नंतर एम. एस. डब्ल्यू. द्वितीय वर्षातील संजना वानखेडे आणि एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षातील आयशा तडवी यांनी एन. एस. एस. गीताचे गायन केले.

उद्घाटन कार्यक्रमाला मंचावर उपस्थित कार्यशाळेचे प्रमुख वक्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालक विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. मनिष करंजे, उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, रासोयो पारोळा विभागाचे समन्वयक डॉ. जगदीश  सोनवणे, रासोयो जळगाव विभागाचे समन्वयक डॉ. नितीन बडगुजर, जेष्ठ प्राध्यापक डॉ. यशवंत महाजन, रासोयो कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश  चौधरी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते रासोयो विद्यार्थी प्रतिनिधी गणेश बाविस्कर उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच २४ सप्टेंबर १९६९ साली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालय मार्फत राबवण्यात आली. १९६९ मध्ये पायलट स्वरूपात देशातील केवळ ३७ विद्यापीठात आणि केवळ ४०,०००/- विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती. आज संपूर्ण भारतामध्ये ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रीय सेवा योजनेत ३२ लाखांपेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेत असताना २ वर्ष आणि पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेत असताना २ वर्ष राष्ट्रीय सेवा योजना युनिटमध्ये सहभाग घेता येतो.

या योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना स्वंयसेवक या नाम्मोच्चाराने संबोधिले जाते. याच संकल्पनेतून स्वंयसेवकाला २ वर्षात श्रम संस्कारातून समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजवून घेऊन रचनात्मक कार्य करणे, या सारख्या विविध उपक्रमांमधुन हा विद्यार्थी प्रशिक्षित होतो. विद्यार्थी मित्रहो या शैक्षणिक वर्षात आजच्या कार्यशाळेतून तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजना या योजनेत सहभागी झाल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विविध गुण हे कसे विकसित होतील याचा प्रत्यक्ष अनुभवाचे अनेक दाखले अनुभवयास मिळतील असे प्रास्ताविकात सांगितले.

प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील डॉ. जगदीश सोनवणे यांना  नुकतेच भारत सरकार द्वारा “सार्वजनिक आरोग्यासाठी अंतर वैयक्तिक हिंसाचार एक अभिनव दृष्टिकोन” या संशोधनाचे पेटंट मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ. यशवंत महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रथम सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. मनिष करंजे यांनी “आजचा युवक आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग”  या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना राष्ट्राबद्दल प्रेम भावना आणि निकोप समाज निर्मितीचे बाळकडू हे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटमध्ये सहभागी झाल्यावरच मिळते आणि या श्रमसंस्काराच्या अनुभवातूनच या स्वयंसेवकाला त्याच्या उज्वल भविष्याच्या अनेक संधी सहज उपलब्ध होतात. परंतु अलीकडील काळात या स्पर्धेच्या युगामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्वल भविष्याच्या संधी चाचपडत असतात. परंतु मला या ठिकाणी या युवकांना निश्चितच सांगायला आवडेल की स्पर्धा परीक्षा मध्ये झोकुन अभ्यास करण्यासाठी त्यांना त्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ हे सदृढ ठेवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी व्हावे जेणेकरून  श्रमसंस्कारामुळेच समाजाबद्दलची कृतज्ञता ही त्यांना व्यक्त करता येईल.

या प्रत्याक्षिकक अनुभवातूनच जे विद्यार्थी निपुण होतील. ते स्वंयसेवक निश्चितच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा आत्मियतेने करून त्यांनी निश्चित केलेले ध्येय आणि उद्देश्य साध्य करण्यासाठी त्यांना मदत होईल असे प्रतिपादन केले.

द्वितीय सत्रात विभागीय समन्वयक डॉ. जगदीश सोनवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टेचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनो समाजाच्या गरजांची माहिती करून घेत असताना त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्या दूर करण्यासाठीची प्रेरणा राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाल्यावरच मिळते. विद्यार्थी मित्रहो या २ वर्षांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमातून समाजाबद्दलची बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन आपण आपला स्वतःचा विकास उत्कृष्टरित्या करू शकतो. विद्यार्थी मित्रहो या २ वर्षात तुमच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होऊन सर्वत्र आपण लोकशाही प्रवृत्तीचा विकास आपण करू शकतो असे प्रतिपादन केले.

तृतीय सत्रात जळगाव विभागाचे समन्वयक डॉ. नितीन बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप समजावून सांगत असताना राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात १२० तास समाजसेवेची कामे आणि विशेष श्रमसंस्कार शिबिर करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असतो. त्यातंर्गत रोग प्रतिबंधक लसीकरण, एड्स रोग प्रतिबंधक मार्गदर्शन , मोफत रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, रोग निदान शिबिर, ग्रामसफाई, साक्षरता, पर्यावरण,  सामाजिक सामंजस्य, राष्ट्रीय एकात्मता इत्यादी समाज जीवनाची निगडित कार्यक्षेत्रात स्वयंसेवकांना प्रत्यक्ष कार्य करण्याचा अनुभव प्राप्त होत असतो असे प्रतिपादन केले.

कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात  NOT ME BUT YOU आणि “शिकवा एक तरी आणि झाड लावा एक तरी” या घोषवाक्य मागील अर्थ स्पष्ट करून सांगितला. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभागी झालेला स्वयंसेवकांनी २ वर्षात त्यांना विविध समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आणि त्यातूनच उभय समाजाच्या रचनात्मक व्यवस्थेचा अभ्यास करून समाजाच्या निरंतर चालणा-या विकास प्रक्रियेत निर्माण झालेल्या गरजा, प्रश्न आणि अवाहने तो समजुन घेणार आहे. व्यावसायिक समाजकार्याचा अभ्यासक्रमाच्या अभ्यास पद्धतीचा उपयोग करून समाजकार्य मध्येस्थतेच्या समन्वयातून समाजकार्याचे विद्यार्थी उत्कृष्ट कार्य सातत्याने करीत असतात याचा प्रमुख उदाहरण म्हणजे पाल सहस्रलिंग लाल माती या परिसरातील सातपुडा पर्वत तेथील वृक्षारोपण सीसीटीव्ही बंधारे हे राष्ट्रीय सेवा योजनाच्या विशेष संस्कार शिबिरातून निर्माण झालेले आहेत. सोबतच सामाजिक संशोधन पद्धतीचा अवलंब करून आदिवासी आणि ग्रामीण समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास करीत असतात. या अभ्यासाचा बहुमूल्य असा उपयोग जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाला नक्की होतो, त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यातील विविध लोककल्याणकारी प्रकल्पांवर महाविद्यालयाचे विद्यार्थी आज काम करीत आहेत. असे प्रतिपादन केले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राजकुमार पवार, प्रवीण जोशी, चेतन नारखेडे यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. अशोक हनवते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भारती गायकवाड यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.