Diwali 2021: बलिप्रतिपदा अर्थात पाडवा सणाची विशेष माहिती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा… पाडवा! साडे तिन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात या दिवसापासुन करावी.

हा दिवस बळीराजाचा स्मरणदिन म्हणुन देखील पाळला जातो. बळीराजा राक्षस कुळात जन्माला आला असला तरी तो अतिशय दानशुर होता. त्याची दानी वृत्ती एवढी विकोपाला पोहोचली होती की देवांना देखील या गोष्टीची काळजी वाटु लागली. सामान्य माणसं देवाच्या आधी देखील बळीराजाचे नाव घेवू लागली आणि त्यामुळे देवांच्या चिंतेत भर पडली. हे जर असेच सुरू राहीले तर देवाच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचेल अशी काळजी देवांना वाटु लागल्याने बळीराजाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सर्व देवांनी भगवान विष्णूवर सोपवली.

बळीराजाने एक यज्ञ आयोजित केला होता. हा यज्ञ यथासांग पार पडल्यानंतर दान देण्याची पध्दत होती भगवान विष्णुंनी वामन अवतार धारण केला लहान ब्राम्हण बटुच्या रूपात ते बळीराजा समोर येऊन उभे राहिले बळीराजाने वामनाला प्रणाम करून “काय हवे ते मागण्याची विनंती केली” वामनाने “मला केवळ त्रिपादभुमी हवी आहे” असे बळीराजाला सांगीतले.

बळीराजाला सर्व उमगले परंतु काय हवे ते देण्याचे वचन दिल्याने त्याने मागणी मान्य केली. वामनाने पहिले पाऊल ठेवले आणि सर्व स्वर्ग व्यापला… दुसऱ्या पावलात संपुर्ण पृथ्वी व्यापली. वामनाने बळीला प्रश्न केला “तिसरे पाऊल कुठे ठेवु? त्याक्षणी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले भगवान विष्णुंनी त्याच्या मस्तकावर पाय ठेवुन त्याला पाताळात गाडले.

बळीराजाच्या दानशुर वृत्तीमुळे वामनावतारातले भगवान विष्णु प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला पाताळाचे सर्व राज्य बक्षीस म्हणुन दिले आणि त्याचा व्दारपाल होण्याचे कार्य स्विकारले.

ज्याक्षणी भगवान विष्णूंनी वामनावतारात तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवले त्यापुर्वी वामनाने बळीला वर मागण्यास सांगीतले त्यावेळेस बळीराजा म्हणाला या क्षणापासुन माझे पृथ्वीलोकातले काम संपुष्टात येणार आपण मला पाताळात धाडणार म्हणुन दरवर्षी तीन दिवस तरी हे माझे राज्य म्हणुन ओळखले जावे वामनाने त्याची ईच्छा पुर्ण केली त्यामुळेच आश्विन कृष्ण चतुर्दशी, अमावस्या आणि कार्तिक शुध्द प्रतिपदा या तिथीला बळीराज्य असे म्हणण्याची परंपरा आहे.

भगवान विष्णुंनी बळीराजाची दानशील, सत्वशिल वृत्ती पाहुन या क्षणी राजाला वरदान दिले बलिप्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या दानशुरतेची क्षमाशीलतेची पुजा करतील, जो कोणी बलिप्रतीपदेला दिपदान करेल त्याला कधीही यमयातना भोगाव्या लागणार नाहीत व त्याच्याकडे सदैव लक्ष्मीचा वास राहील…

भगवान विष्णुंचे त्यांच्या पत्नीला अर्थात लक्ष्मीला फार कौतुक वाटले त्यामुळे तिने त्यांचे औक्षवण केले. विष्णूंनी ओवाळणी म्हणुन तबक हिरेमाणकांनी भरून टाकले. यामुळे पाडव्याला पत्नीने पतिला ओवाळण्याची प्रथा सुरू झाली. बलिप्रतिपदेला पत्नी पतीचे औक्षवण करते आणि पती तीला भेटवस्तु देतो.

बळीराजाचे त्याची पत्नी विंध्यावलीचे चित्र काढुन पुजा केली जाते. वस्त्र आणि दिव्याचे दान दिले जाते.

‘इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो’ असे आजच्या दिवशी म्हणण्याची पध्दत आहे. फटाक्यांची आतीषबाजी रोषणाई केली जाते. साडे तिन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आज असल्याने नव्या वस्तुंची विशेषतः सोने खरेदी करण्याची देखील पध्दत बऱ्याच ठिकाणी आहे.

बलिप्रतिपदेला गोवर्धन पुजा देखील करतात. शेणाचा गोवर्धन पर्वत तयार केला जातो या पर्वतावर फुले वाहुन दुर्वा खोचल्या जातात. जवळच भगवान श्रीकृष्ण, राधा, गोपगोपीका, इंद्र, गायी वासरांची चित्र रेखाटुन त्यांची पुजा केली जाते आणि नैवेद्य दाखवीला जातो. कित्येक ठिकाणी भव्य मिरवणुक देखील काढली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.