डेहराडून एअरपोर्टवर ३२ वर्षीय मॉडेलला अटक, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलला डेहराडून एअरपोर्टवर अटक करण्यात आली आहे. या मॉडेलने एअरपोर्टवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकासोबत गैरवर्तन केले आणि एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या घटनेनंतर या मॉडेलला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामिनावर तिची सुटका झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघा शर्मा असं या ३२ वर्षीय मॉडेलचे नाव आहे. ती मुंबईमध्ये राहते. डेहरादूनच्या जॉली ग्रँट एअरपोर्टवर तैनात असलेल्या महिला सीआयएसएफ अधिकाऱ्यांसोबत तिने गैरवर्तन केले. त्याचसोबत तिने एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी सीआयएसएफ उपनिरिक्षक सुनीता देवी यांनी तक्रार केली. या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली होती.

एअरपोर्टवर बॅग चेकिंग करत असताना या मॉडेलने वाद घेतला. मेघाच्या हँडबॅगच्या फोटो स्क्रिनिंग सिस्टमवर स्पष्टपणे दिसत नव्हता. त्यामुळे सुनीता देवी यांनी मॅन्युअली हँडबॅग चेकिंगची विनंती केली. त्यावेळी मेघाने त्यांच्यासोबत वाद घातला आणि अपशब्दांचा वापर करत तिने एअरपोर्टवर गोंधळ घातला. जेव्हा सुनीता देवी यांनी मेघाला सहकार्य करण्याचे आवाहन केले तर तिने एअरपोर्ट बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिली.

मेघा तिच्या एका मित्रासोबत मसुरीला गेली होती. त्यानंतर ती शुक्रवारी दुपारी ३.१० वाजता फ्लाइटने मुंबईला परत येण्यासाठी निघाली होती. पण एअरपोर्टवर तिने नियमित बॅग स्कॅनिंगदरम्यान महिला सीआयएसएफ अधिकाऱ्यांसोबत भांडण केले. मेघाने सिक्युरिटी प्रोटोकॉलचे पालन करण्यास नकार दिला. तिने फक्त सहकार्य करण्यास विरोध केला नाही तर तिने एअरपोर्ट बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिली.

यानंतर सीआयएसएफ अधिकाऱ्याने एअरपोर्टवर गोंधळ घालणाऱ्या मेघाला ताबडतोब पकडलं आणि स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी मेघाविरोधात कलम ३५३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक केली. या घटनेनंतर शुक्रवारी रात्री मेघाची जामीनावर सुटका करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.