वेतन पथकाच्या मनमानीला आळा बसलाच पाहिजे- डी. ए. धनगर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिक्षण विभाग आणि शिक्षक यांची आर्थिक नाडी जोडणारा दुवा म्हणजे पे युनिट (वेतन पथक) होय. शिक्षकांची अनेक कामे पे युनिट शिवाय होऊच शकत नाही. वेळोवेळी शिक्षकांना पे युनिटकडे जावे लागते व चकरा माराव्या लागतात. त्याचा नाहक त्रास शिक्षकांना होतो. त्यातच घरचे कुणी आजारी पडले, त्यांच्यासाठी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती तसेच घरातील वडीलधारी मंडळी यांचे आजारपण त्यात होणारा खर्च, बिघडणारे मानसिक स्वास्थ्य व पे युनिट करत असलेली होरपळ याचा साकल्याने विचार केल्यास, आत्मक्लेश झाल्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. असे एक ना अनेकदा घडते व ते पुन्हा पुन्हा घडते याचा जाब कोण विचारणार?…. मुके बिचारे कोणीही हाका…. याप्रमाणे आपण सर्व सहन करत आहोत. परंतु या सर्व गोष्टींना आळा बसला पाहिजे अशी मागणी समस्त शिक्षक वर्गाच्या वतीने करत आहे.

आपण सर्वांना ज्ञात आहे की कोरोना महामारीने घराघरात रुग्ण आढळून आले. त्याचा फटका सगळ्यांनाच बसला. संबंधित बिले वर्षभरापासून मंजूर होवून प्रलंबित आहेत. अनेकांची काही वर्षांपूर्वीची वैद्यकीय प्रतिपूर्ती ची बिले त्यात आहेत ते अगदी काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती बिले मंजूर झाली. ती शिक्षकांना वितरीत करण्याची वेळ आली. तेव्हा अनेक शिक्षकांच्या शाळांची सॅलरी अकाऊंट नाही असे बेजबाबदार कारण देण्यात आले‌.

जर दर महिन्याचा पगार पे युनिट करत असेल. तर त्यांच्याकडे सॅलरी अकाऊंटची नोंद असलीच पाहिजे. दर महिन्याला शाळेचा सॅलरी अकाऊंट त्यांच्याकडे असतो, तरी ते अकाऊंट ची मागणी करतात हे चुकीचे वाटते. आधीच ह्या बिलांना उशीर झालेला आहे आणि त्यात अजून अकाउंट नंबरचा खोडा आहे‌. याला काय म्हणावे?

तसेच प्रत्येक महिन्याला शिक्षकांना पगार करण्याची वेळ येते त्यावेळी सुद्धा काही ना काही कारण सांगून, शिक्षकांचा पगार लांबवला जातो. एक तारखेला न करता त्यापेक्षा पुढच्या तारखेला होतो. हद्द म्हणजे जेव्हा एखाद्या महिन्याचा पगार वीस तारखे नंतर होतो, तरी सुद्धा कोणी याविषयी जाब विचारत नाही, आवाज उठत नाही हे मोठं दुःख आहे. तरी डी. ए. धनगर अमळनेर समस्त अधिकाऱ्यांना असे निवेदन करतो कि, यात जो कोणी दोषी असेल त्यांना शासन करून शिक्षक वर्गाला तसेच सर्व पगारदार मंडळीला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करावा ही विनंती. जर आपण यात लक्ष घातले नाही तर आगामी काळात शिक्षकांचा मोठा रोष ओढवल्याशिवाय राहणार नाही. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी असतील.

डी. ए. धनगर सर
माजी जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना जळगाव.
अमळनेर जिल्हा जळगाव
9423934577

Leave A Reply

Your email address will not be published.