विशाल जोशी, लोकशाही न्यूज नेटवर्क
वाकोद ता. जामनेर
‘एक होता कावळा, एक होती चिमणी, कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीच घर होत मेणाच” ही गोष्ट आपण पिढ्यान् पिढ्या ऐकत आलो आहोत. त्या गोष्टीतील कावळ्याचं घर पावसात वाहून जातं आणि चिमणीचं घर मेणाचं असल्याने ते वाहून जात नाही, असा त्या गोष्टींचा शेवट व्हायचा. पण आज चिमणीचं घरटच वाहून गेलं की काय अस वाटू लागलं आहे.
शहरात, गावखेड्यात चिवचिवाट चिमण्या एकदम दिसेनाशा झाल्या आहेत. खरचं आपण आपल्याच कामात इतके गुंतून गेलेले असतो की आजवर आपल्याभोवती नाचणारी चिमणी नाहीशी झालीय, हे वास्तव आपल्या लक्षात येत नाही. मनुष्याच्या जीवनात कायमच स्थान मिळवलेली चिमणी एकदम दिसेनाशी का झाली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
चिमण्यांची घरटी वळचणीत असायची. क्राँक्रिटच्या घरांमुळे चिमण्यांची वळचणीची जागाच नाहीशी झाली आहे. याशिवाय कीटकनाशकांच्या वापरांमुळे चिमण्यांना खायला मिळणारे किडे मिळेनासे झाले आहेत. तेही एक कारण चिमण्यांची संख्या रोडावण्याचे असू शकते. याशिवाय मोबाईलच्या टॉवरमधून ज्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह निघतात त्यादेखील चिमण्यांना मारक ठरत असाव्यात असाही एक तर्क आहे.
अन्य पक्षी ज्याप्रमाणे स्थलांतर करतात त्याप्रमाणे स्थलांतर करण्याची ताकद चिमण्यांच्या पंखात नसते. चिमण्या एक-दोन किलोमीटर अंतरच उडू शकतात. त्यामुळे दुसऱ्या चांगल्या निवा-याच्या शोधात हिंडण्यापेक्षा त्यांना मरण पत्करणे सोपे वाटते. चिमण्यांची संख्या जसजशी कमी होईल तसतशी चिमण्यांची गाणीसुद्धा निरर्थक ठरतील. ‘चिऊताई ये, दाणा खा, पाणी पी, बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन उडून जा” असं म्हणण्यासाठी उडणारी चिमणी इतिहासजमा झालेली असेल.