शाळकरी मुलीवर बलात्कार नराधमास 10 वर्षे कारावास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

राजगुरुनगर : आंबेगाव तालुक्यातील एका गावात दि. 3 जुलै 2014 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली . गावातील 10 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सनिल ऊर्फ सुनील बबन उधारे (वय 31, रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.

आंबेगाव तालुक्यातील एका गावात दि. 3 जुलै 2014 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित 10 वर्षाची मुलगी तिच्या लहान भावासोबत शाळेतून घरी पायी जात होती. आरोपी सनिल उर्फ सुनील उधारे याने त्यांना वाटेत गाठले व दुचाकीवर घरी सोडतो असा बहाणा केला. बहीण व भावाला दुचाकीवर बसवून आरोपी उसाच्या शेताच्या जवळून कच्च्या रस्त्याने चालला होता.

काहीतरी वाईट हेतू असल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने दुचाकी थांबवण्यास सांगून ती दुचाकीवरून उतरून तेथून पळू लागली. आरोपीने पाठलाग करून तिला पकडून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. पीडित मुलीने ही घटना घरी सांगितल्यानंतर आरोपी उधारे याच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक एम. टी. जाधव यांनी आरोपीस दि. 5 जुलै 2014 रोजी अटक केली होती.

हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्यासमोर सुरू होता. खटल्यात सरकारी वकील रजनी नाईक- देशपांडे यांनी 8 साक्षीदार तपासले. रजनी नाईक यांचा युक्तिवाद व साक्षी-पुरावे यांच्या आधारे आरोपी सनिल उर्फ सुनील उधारे याला दोषी ठरवण्यात आले.

न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी बुधवारी (दि.20) या खटल्याचा निकाल दिला. आरोपीस भादंवि 376 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्ष साधा कारावास, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा 2012 चे कलम 4 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास, कलम 8 अन्वये 4 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास, कलम 10 अन्वये 5 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या एकूण 20 हजार रुपये रकमेपैकी 15 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला. या खटल्याचे न्यायालयीन कामकाज पोलिस आर. एम. जाधव आणि एम. आर. बटवाल यांनी पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.