‘न्यूड डान्स’ प्रकरण : ठाणेदाराची तडकाफडकी बदली

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नागपूर : ठाणेदाराची तडकाफडकी बदली. बाम्हणी येथील ‘न्यूड डान्स’ प्रकरणात आणखी एका प्रमुख सुत्रधारास सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. मंगेश वामन पाटील (२९, रा. कुही) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आता आरोपींची संख्या १२ झालेली आहे.  इकडे उमरेड  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांची मंगळवारी तडकाफडकी बदली झाली. त्यांच्याऐवजी उमरेड पोलीस ठाण्याचा कार्यभार प्रमोद माणिक घोंगे यांच्याकडे सोपविण्यात आला.

यशवंत सोलसे यांना बाम्हणी येथील ‘डान्स हंगामा’ कार्यक्रम भोवला असल्याचे बोलले जात आहे. त्यांची नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली झाल्याची माहिती आहे.

मंगेश पाटील हा ‘एलेक्स जुली के हंगामे’ या डान्स हंगामा कार्यक्रमाचे सादरीकरण करणाऱ्यापैकी प्रमुख होता. तो कुही भागातील असल्याने आयोजकांपैकी अनेकांच्या संपर्कात होता अशीही माहिती आहे. मंगेशला मंगळवारी उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. त्याची लगेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

उमरेड पोलीसांनी यापूर्वी अटक केलेल्या एकूण ११ आरोपींपैकी चार आरोपींना २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अन्य सात आरोपींना मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.‘डान्स हंगामा’ प्रकरणात उमरेड, कुही आणि मौदा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन महिलांची सुद्धा चौकशी केल्या गेली. यापैकी एका महिलेस सूचना पत्रावर सोडण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिली.

प्रमोद घोंगे हे रामनगर गोंदिया पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यावर होते. मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घोंगे उमरेड येथे पोहोचले. येताच त्यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याच्या परिसराची पाहणी केली व पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

उमरेड तालुक्यातील ‘न्यूड डान्स’ प्रकरणाबाबत गावातील पोलीसपाटील, बाम्हणी बीट जमादार आणि अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती नव्हती काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी शंकरपटात उपस्थित पोलीस कोण, याबाबतही चर्चा सुरू असून, कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा बीट जमादार आणि कर्मचारी यांनी अधिकाऱ्यांना अवगत का केले नाही, असाही सवाल विचारला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.