जळगावात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला

0

जळगावं  :- शहरातील संभाजीनगर परिसरातील नित्यानंद नगर येथील तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी आणण्यात आला होता. दरम्यान तरुणाचा मृत्यू अज्ञात इसमांनी मारहाण केल्यामुळे झाला, असा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी घातापाताची  शक्यता वर्तवली असून सध्या रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पवन सुधाकर दुसाने (वय ३२, नित्यानंद नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. पवन हा आई, वडील, भाऊ, पत्नी, २ मुली यांच्यासह राहत होता. तो हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. तो बुधवारी १३ रोजी रात्री बाहेर गेला होता. तेथून रात्री घरी परतल्यावर तो झोपून गेला. सकाळी मात्र तो उठलाच नाही. सकाळी ९ वाजता कुटुंबीयांनी पाहिले तर त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसून येत होत्या. नाकावर, कमरेवर जखम, दोन्ही पायांना मारहाणीसारखे वळ दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.