ऑस्ट्रेलियाची टीम काळ्या पट्ट्या लावून मैदानात ; काय आहे कारण …

0

अहमदाबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजची चौथी आणि निर्णायक टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये सुरू आहे. आज मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची टीम काळ्या पट्ट्या लावून मैदानात आली.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्स याच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले. हे वृत्त कळताच शोक प्रकट करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी मॅचच्या दुसऱ्या दिवशी दंडाला काळ्या पट्ट्या (ब्लॅक आर्म बँड) लावून खेळण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करून या निर्णयाची माहिती दिली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हंटले आहे की, “मारिया कमिन्स यांचे रात्री निधन झाल्याचे आम्हाला खूप दुःख आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने, आम्ही पॅट, कमिन्स कुटुंब आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मनापासून शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियन पुरुष संघ आज आदराचे चिन्ह म्हणून ब्लॅक आर्म बँड घालून खेळेल.”

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने घरी राहण्यासाठी आणि आजारी आईसोबत राहण्यासाठी भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. “माझी आई आजारी असल्याने मी सध्या भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी तिची काळजी घेण्यासाठी आलो आहे,” असे कमिन्सने एका निवेदनात म्हटले आहे.

पॅट कमिन्सने नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याच्या आईची प्रकृती खालावली. आईची काळजी घेण्यासाठी तो मालिका सोडून ऑस्ट्रेलियाला परतला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.