बापरे.. कोरोना झालेल्यांना हार्ट अटॅकचा अधिक धोका?, काय आहे सत्य

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कोरोनासारख्या महाभयंकर संकटावर आपण मात केला मात्र या कोरोनाने अनेकांचा जीव घेतला. तसेच आता हृदयविकाराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मोठे विधान केले आहे. कोविड-१९ च्या गंभीर संसर्गाशी लढा दिला असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे सांगितलं आहे. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी अशा लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

 हृदयविकाराचा करोनाशी संबंध

हृदयविकाराचा करोनाशी काही संबंध आहे का? हा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासाचा हवाला देत मांडविया म्हणाले की, करोना संसर्ग झालेल्या लोकांनी किमान दोन वर्षे जड काम करणे आणि आणि अधिक तीव्रतेचा व्यायाम करणे टाळणे आवश्यक आहे.

हृदयरोगतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अशी घटना तीन रुग्णांमध्ये आढळून आली आहे. कोविड-१९ झालेला बायपास रुग्ण बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याने हृदयविकाराची तक्रार केली होती. तेव्हा डॉक्टरांना सुरुवातीला वाटले की त्याचे बायपास ग्राफ्ट्स निकामी झाले आहेत. जेव्हा त्यांनी अँजिओग्राफी पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बायपास ग्राफ्ट ठीक आहेत; परंतु नवीन ब्लॉकेजेस आणि गुठळ्या तयार झाल्या आहेत, जे शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांमध्ये खूप असामान्य आहेत.

जगभरातील हृदयरोगतज्ज्ञांना अद्यापही कोविड-१९ आणि हृदयरोग यांच्यातील नेमका दुवा निश्चित करता आला नाही. कोविड-१९ मुळे तणाव आणि मधुमेह यांसारख्या हृदयविकाराच्या इतर घटनांमध्ये वाढ झाली आहे. डॉक्टर म्हणतात, “तुम्ही व्यायामाची कोणतीही पद्धत सुरू करण्यापूर्वी, तुमच्या हृदयाची अगोदर तपासणी करा, जेणे करून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती असेल.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेस (ICMR) च्या अभ्यासात ज्या लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त आहे, असा दावा करण्यात आला आहे. याच अभ्यासाचा हवाला देत मांडविया म्हणाले की, अशा लोकांनी किमान दोन वर्षे फार जास्त मेहनतीची कामं करणं आणि अति जास्त व्यायाम करणं टाळणे आवश्यक आहे. त्यावर डॉक्टरांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, “गेल्या २५ वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त आहे आणि दरवर्षी त्यांचे प्रमाण वाढत आहे”, त्यामुळे आपल्याला आपल्या हृदयाला बळकट आणि निरोगी ठेवायचे असल्यास, कमी चरबी आणि कमी साखरयुक्त आहार घ्या. तसेच जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा आणि नियमित व्यायाम करण्याचा ते सल्ला देतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.