काँग्रेसची १५० नेत्यांना नोटीस

0

भोपाळ : मध्य प्रदेशात गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कथितरीत्या पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या व पराभवाला जबाबदार असणाऱ्या जवळपास १५० स्थानिक नेत्यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. १० दिवसांत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा या नेत्यांना देण्यात आला.

आहे. शुक्रवारी मध्य प्रदेश शिस्तपालन समितीची बैठक झाल्यानंतर या नेत्यांना नोटीस पाठवल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाला एक महिन्याहून अधिक काळ पूर्ण झाल्यानंतर पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात काँग्रेसने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

आहे. विधानसभा निवडणुकीत २३० जागांपैकी केवळ ६६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पक्षात सर्व काही सुरळीत करण्यासाठी काँग्रेसतर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. शिस्तभंग व विश्वासघात कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, हा संदेश देण्याच्या उद्देशाने प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आपल्या नेत्यांना नोटीस पाठवली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १६४ पेक्षा अधिक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. पक्षातील नेत्यांनी केलेल्या विश्वासघातामुळे पराभव झाल्याचा दावा काँग्रेसच्या उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे पक्षाविरोधी कारवायांमध्ये सहभागी लोकांनी निर्धारित वेळेत समाधानकारक उत्तरे दिली नाही तर त्यांना निलंबित करण्याचा इशारा शिस्तपालन समितीचे प्रमुख व प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अशोक सिंह यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचीदेखील पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिस्तपालन समितीने घेतला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने २३० पैकी १६३ तर काँग्रेसने केवळ ६३ जागांवर विजय मिळवला.

Leave A Reply

Your email address will not be published.