नंदुरबारच्या आदित्यला मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

0

नवी दिल्ली: नदीत बुडत असलेल्या आपल्या चुलतभावाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची कुरवंडी देणारा नंदुरबारचा आदित्य ब्राह्मणे हा यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आदित्य ब्राह्मणे याच्यासह यंदा १९ बालकांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांवर आपली नाममुद्रा कोरली आहे. त्यात ९ मुले आणि १० मुलींचा समावेश असून, २२ जानेवारी रोजी विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. आदित्य आणि त्याचा चुलतभाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. त्यावेळी अचानक त्याचा चुलतभाऊ नदीत बुडू लागला.

आदित्यला स्वतःला पोहता येत नव्हते. पण भावाला वाचवण्यासाठी जीववरचा धोका पत्करून तो नदीत उतरला. भावाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न त्याने केला, पण दुर्दैवाने खोल पाण्याने त्याचा बळी घेतला. बुडून त्याचा मृत्यू झाला. अशा कठीण प्रसंगात आदित्यने आपले अतुलनीय शौर्य दाखवले. त्याबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये छत्तीसगड येथील ‘गुगल मॅथ बॉय’ म्हणून ओळखला जाणारा ६ वर्षीय अरमान उभ्राणी, शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणारे ‘सो-अॅप्ट’ हे वाहन तयार करणारी दिल्लीची सुहानी चौहान, सेरेब्रल पाल्सीसारख्या आजाराशी झुंजत असतानाही २५० मुक्तहस्त पेंटिंग्ज चितारणारी वडोदऱ्याची हेत्वी कांतीभाई खिमसुरिया, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बहुउपयोगी अँग्रोबॉट तयार करणारा कोटातील १७ वर्षीय आर्यन सिंग, तसेच बालविवाह प्रथेशी संघर्ष करणारी त्रिपुरातील १६ वर्षीय
ज्योत्स्ना अख्तर यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.