चोपडा तालुक्यातील वाळकी येथे आठ बिघे अफूच्या शेतीवर कारवाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
चोपडा, मिलिंद सोनवणे

* झटपट श्रीमंत होण्यासाठी केली अफू शेती.
* मोबाईल युट्युबवरून मिळविली माहिती.
* कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळाले असते.
* तीन महिन्याचे अफू पीक काढणीला आले होते.
* अफूचे पीक दिसू नये म्हणून चारही बाजूला मक्याचे पीक.
* अफू संदर्भातील बरीच माहिती उलगडण्याची शक्यता
* पोलिस अधीक्षक डॉ. मुंडेसह अधिकारी घटनास्थळी

चोपडा तालुक्यातील वाळकी येथील तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात 8 बिगे इतकी अफूची केलेली लागवड पोलिसांनी धाड टाकून उघडकीस आणली असून येत्या 8 ते 10 दिवसात हे अफूचे पीक काढून त्या पोटी कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळण्याचे स्वप्न पहात असतांना त्याआधीच पोलिसांनी धडक कारवाई करून आरोपी प्रकाश सुधाकर पाटील यास अटक केली आहे.

काल गुरूवारी संध्याकाळी चोपडा ग्रामीण पोलिसांनी याची गुप्त वार्ता मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवीदास कुनगर आणि त्यांच्या स्टाफने ही कारवाई केली. दरम्यान गुरूवारी रात्री सदर अफूच्या शेतीच्या रक्षणासाठी जळगावहून सीआरपी फ्लाटून दाखल झाले होते. या शेतीला जणू छावणीचे स्वरूप आले होते. आरोपी प्रकाश सुधाकर पाटील हा एका लग्नानिमित्त बाहेरगावी गेला होता. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक जाऊन त्याला रात्रीच ताब्यात घेण्यात आले होते.

याबाबत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी मोबाईलच्या युट्यूबवरून माहिती मिळवून आरोपी प्रकाश सुधाकर पाटलाने ही अफूची शेती केली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

सदर अफूची शेती वाळती शिवारातील बुधगाव रोडवर असून चोपड्यापासून सुमारे 35 कि.मी. अंतरावर तर वाळकी गावापासून 7 ते 8 कि.मी. अंतरावर आहे. अफूच्या शेतीचे वृत्त कळताच प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी श्री. ढेरे, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो.नि. देवीदास कुनगर, उपनिरीक्षक वसावे यांनी भेट दिली. त्यांचे उपस्थितीत अफू शेतीचा पंचनामा करण्यात आला.

आठ बिघ्यामध्ये अफूची लागवड ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी घटना असून आरोपी प्रकाश सुधाकर पाटील याने अफूची शेती इतरांना दिसू नये म्हणून त्याच्या चारही बाजूने 15 ते 20 फूट एवढे मक्क्याची लागवड केली होती. तथापि अखेर हे बिंग फुटले.

आज सकाळी वाळकी शिवारातील अफूच्या शेतीचे वृत्त वाऱ्यासारखे जिल्ह्यात पसरले. सोशल मिडियावर हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. चोपडे तालुक्यातील अनेकांनी ही अफूची शेती पहाण्यासाठी वाळकी शिवाराकडे धाव घेतली.

आरोपी प्रकाश सुधाकर पाटील

हा तरुण वाळकी गावातील रहिवासी असून त्याचे वय 36 ते 37 वर्षे इतके आहे. त्याचे शिक्षण 12 वी पर्यंत झालेले आहे. त्याच्या मालकीची 5 एकर शेती असून त्याच्या लागवड एकर शेती इतराची वर्षाला 20 हजार रूपये देऊन कसायला घेतली आहे. मोबाईलच्या युट्युबवरून माहिती मिळवून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न यातून तो पहात होता. तथापि पोलिसांना मात्र कर्जबाजारी असल्याने हे पाऊल उचलले असे सांगतो.

पोलिस तपासात आणखी बराच उलगडा होऊ शकतो

या प्रकरणी पंचनामा करून पोलिसांनी आरोपी प्रकाश सुधाकर पाटील यास अटक करून पुढील तपास करीत आहेत. कारण अफूच्या शेतीची कल्पना जरी युट्युबवरून मिळाली असली तरी त्याचे बियाणे कुठून आणले. त्याची लागवड केली त्यानंतर 3 महिने त्याची गुप्तता कशी काय राहिली. त्याचबरोबर अफूची शेती कुणाला दिसू नये म्हणून चारही बाजूला संरक्षणार्थ मका लावण्याची कल्पना कुठून सूचली. तसेच त्याच्या या कृत्यात अजून कुणाचा समावेश आहे का? तसेच महाराष्ट्रात आणखी कुठे कुठे अशा प्रकारच्या अफूच्या शेतीती माहिती मिळू शकते का? याचा पोलिस उलगडा करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.