निमगव्हाणला आरोग्य शिबिरात २११४ रुग्णांची तपासणी

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील निमगव्हाण येथे आयोजित विनामूल्य जनआरोग्य तपासणी व उपचार शिबिरासह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमगव्हाण गावासह तापी परिसर व तालुक्यातील आलेल्या रूग्णांवर या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले. तब्बल २१०० हून आधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली.

तसेच रक्तदान शिबिरात २२ युवकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान करुन मानवतेचा संदेश दिला. रक्तदान शिबिराचे यंदा अकरावे वर्ष होते. रक्त संकलित करण्यासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयातील रक्त संक्रमण परिषदेला पथक उपस्थित होते.

आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या व आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या गरजू रूग्णांसाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार करून घेण्याची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशाने परम पूज्यनीय स्वामी भक्तानंदजी महाराज यांच्या ४१ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत जी.एम.फाऊंडेशन जळगाव व श्री. धुनिवाले दादाजी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निमगव्हाण (ता.चोपडा) येथील श्री. दादाजी दरबाराच्या प्रांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, आमदार लताताई सोनवणे, आरोग्यदूत पितांबर भावसार, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. रितेश पाटील, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. घुंगराळे, शासकीय होमिओपॅथि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन यांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला.

याप्रसंगी श्री. दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष धनराज पोपट पाटील, सचिव संदीप पाटील, सहसचिव राजेंद्र चौधरी, विश्वस्त कस्तूरलाल भाटिया, भगवान पाटील, प्रकाश बिऱ्हाडे, तापी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

शिबीरास माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष छन्नू झेंडू पाटील, चोपड्याचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, चोपडा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील आदी मान्यवरांनी भेट दिली.

तर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीष महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून शिबीरास शुभेच्छा दिल्या. १ टेम्पो भरेल एवढ्या औषधांचे वाटप, १०० हून आधिक डाॅक्टर, नर्स, वार्डबाॅय व आरोग्य विभागाचे कर्मचारी, सर्व रूग्ण व नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्था, तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे शिबीर हे या आरोग्य शिबीराचे वैशिष्ट्य ठरले.

गरजू रूग्णांवर उपचारासाठी स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, जनरल फिजीशियन, रक्ताच्या विविध तपासण्या, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक सल्ला देणे, गरजू रूग्णांना सलाईन लावणे, इंजेक्शन, वाफ व ड्रेसिंग आदी सुविधा देणे यासह विविध तपासणी व उपचार कक्ष उभारण्यात आले होते.

तपासणीतील ज्या रूग्णांवर पुढील उपचार किंवा शस्त्रक्रिया आवश्यक आहे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया व योग्य ते सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत.

सदरील शिबिर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय होमिओपॅथि महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न झाले.

शिबीराअंती तपासणी करणारे सर्व डाॅक्टरर्स, नर्स व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना श्री.दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबीर यशस्वितेसाठी शिबिराचे समन्वयक तथा आयोजक देवानंद पाटील, अनिल बाविस्कर, प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांच्यासह दिलीप पाटील (बाबा), संजय बिऱ्हाडे, चक्रधर पाटील, विशाल पाटील, दिपक बाविस्कर, किरण बिऱ्हाडे, अरूण पाटील, आनंद वैदू, उमेश वसंत बाविस्कर, पंकज ईश्वर पाटील, ललित पाटील, लिलाधर पावरा, प्रा. यशवंत पाटील, नरेंद्र पाटील, जयेश बाविस्कर, योगेश चौधरी, लिलाधर बाविस्कर यांच्यासह श्री. दादा सेवा समिती सदस्यांनी परीश्रम घेतले.

शिबिरासाठी श्री. दादा सेवा समिती, गावातील युवक, सेवाभावी संस्था व प्रमोद टेन्ट हाऊस गृपचे विशेष सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.