पुनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकऱ्याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर बिबट्याने हल्ला चढवून यात गोऱ्हा ठार झाला ही घटना पुनगाव ता.चोपडा येथे शुक्रवारी रात्री ग्रा.प. सदस्य समाधान बळवंत बाविस्कर यांच्या खळ्यात घडली. यात शेतकऱ्याचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने सात वेळा या परिसरात हल्ला करून दहा जनावरे ठार केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. बिबट्याने शुक्रवारी रात्री गोऱ्हावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शनिवारी सकाळी शेतकरी समाधान बाविस्कर खळ्यात गेले असता त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वनविभागाला ही माहिती दिली वनरक्षक सुमित्रा पावरा यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला .

पुनगाव परिसरात तापीनदी असून या तापी नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्या वावरत असतो त्याने आतापर्यंत सहा वेळा हल्ला करून आठ जनावरे ठार केली आहेत. याबाबत ग्रामस्थ व सरपंच यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना अनेक वेळा बिबट्याचा बंदोबस्त्याची मागणी करून ही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. म्हणून शेतकऱ्यांची एवढी जनावरे ठार झाली असून त्यांचे नुकसान झाले आहे. परंतु आता तरी वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी पुनगाव सरपंच किशोर बाविस्कर यांनी केली आहे.

आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांचे नुकसान झालेले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नामदेव धुडकु सपकाळे १ गाय, राजू एकनाथ कोळी१ म्हैस, हिरामण उत्तम बाविस्कर दोन बैल एक म्हैस, हरी बाविस्कर १ बैल, विकास लक्ष्मण खांजोडे १बकरी, निवृत्ती जगन्नाथ सोनवणे १ बैल अशी एकूण आठ जनावरे बिबट्याने ठार केली आहेत. तरी वन विभागाने तापीनदी परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करून सातपुडा जंगलात किंवा इतरत्र सोडावे अशी मागणी पुनगाव ग्रामस्थ करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.