नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
मेसेजिंग अॅप टेलिग्राम, डिजिटल पेमेंट अॅप्स, फोनपे आणि पेटीएम यांच्या विरोधात हैदराबादमधील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता कृष्णन यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियलशी संबंधित आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार हे प्लॅटफॉर्म्स सीएसएएमची विक्री आणि मुलांचे लैंगिक शोषण करण्यास परवानगी देणारे व्यासपीठ बनले आहेत. अडल्ट कंटेंटसोबतच लहान मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक कंटेंटचे वितरण आणि विक्री रोखण्यासाठी अशा प्लॅटफॉर्म्सवर काही प्रोटोकॉल आहेत का? असा प्रश्न कृष्णन यांनी उपस्थित केला. आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे सीएसएएम सारखी गोष्ट जाणूनबुजून प्रमोट केल्याबद्दल निशाणा साधत कृष्णन म्हणाल्या, असे प्लॅटफॉर्म यातून पैसे कमवत आहेत व त्यांना ते काय करत आहेत.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कृष्णन यांना सीएसएएम प्रसारित करणार्या काही टेलीग्राम खात्यांबद्दल माहिती मिळाली होती, त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील त्यांच्या कार्यालयात अॅप डाउनलोड केले आणि खरेदीदार म्हणून प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना सर्च बारद्वारे ‘गर्ल्स अँड बॉयज चॅटिंग’ हा ग्रुप सापडला, ज्यामध्ये 31,000 सदस्य होते. या ठिकाणी त्यांना सीएसएएमशी संबंधित मेसेज सापडले.
याप्रकरणी कृष्णन म्हणाल्या की, अशा ग्रुप्सवर एडमीनचे नियंत्रण असते, जे स्वतः सदस्य काढून टाकू शकतात आणि जोडू शकतात. त्यांची एन्क्रिप्शन प्रणाली स्क्रीनशॉट घेण्यास परवानगी देत नाही. या ठिकाणी सीएसएएमशी संबंधित प्रत्येक कंटेंटसाठी वेगवेगळ्या किंमती आहेत. जेव्हा त्यांनी असा कंटेंट विकणाऱ्या 3 लोकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना कळले की असे ग्रुप लहान मुले चालवतात. मोठ्या संख्येने लोक अवैधरित्या लैंगिक कृत्यांचे व्हिडिओ खरेदी आणि विक्री करत असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला.
तसेच कृष्णन म्हणाल्या, टेलिग्राम मोकाटपणे अशा कंटेंटची विक्री आणि खरेदी करण्याची सुविधा देत आहे. बाल लैंगिक शोषण सामग्रीचा प्रसार हा गुन्हेगारी कृत्य आहे आणि त्यासाठी POCSO कायदा लागू होऊ शकतो, असा इशारा देणारा एकही पॉप-अप टेलिग्रामवर दिसून आला नाही. अशा प्रकारचा कंटेंट विकत घेण्यासाठी पेटीएम किंवा फोनपे अॅपद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. याबाबत कृष्णन यांनी तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने बाल लैंगिक शोषण कंटेंट काढून टाकण्यासाठी टेलिग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस देखील जारी केली होती. टेलीग्राम हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे, ज्याचे जगभरात 800 दशलक्ष वापरकर्ते आहेत. हे जगातील टॉप 10 सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्सपैकी एक आहे आणि भारत, अमेरिका आणि रशिया ही त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहेत. मात्र, या अॅपच्या माध्यमातून फसवणुकीची अनेक प्रकरणेही समोर आली आहेत.