हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा ग्रीन सिग्नल?

0

नाशिक : गेले दोन महिने नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण याबाबत उत्सुकता होती. या संदर्भात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला.

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे यांचा विविध पदाधिकारी मुंबई तळ ठोकून होते. या पदाधिकाऱ्यांची आज पहाटे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. या वेळी उमेदवारीच्या घोषणेला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता असल्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रकर्षाने मांडले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला संमती दिली. त्यांना प्रचाराला सुरुवात करण्याची सूचनादेखील त्यांनी दिल्या. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटाने आता निर्णय घेतला आहे.

महायुतीच्या जागावाटपात ठाणे आणि नाशिक या दोन मतदारसंघांवर महायुतीचे नेते अडकले होते. या दोन्ही जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ही जागा आपल्यालाच हवी, असा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांचा होता. भारतीय जनता पक्षाला आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता ठाणे मतदारसंघ भाजपला हवा होता.

नाशिक मतदारसंघावर देखील भारतीय जनता पक्षाने दावा केला होता. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने ही उमेदवारी मागितली होती. राज्याच्या नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी आणि भाजपचे सहमतीचे उमेदवार होत. या सर्व वादात नाशिक मतदारसंघाचा प्रश्न तीन आठवडे रेंगाळला. अखेर आता त्यावर निर्णय झाला आहे.

दरम्यान, या संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होईल. त्यात अंतिम निर्णय होईल. त्यानंतर उद्या याबाबतचे अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. खासदार गोडसे यांना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबतच्या अनिश्चिततेमुळे भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी गेल्या दोन दिवसांत उचल खाली होती. भुजबळ यांचे समर्थक आणि समता परिषदेनेदेखील नाशिकच्या उमेदवारीसाठीचा आग्रह कायम ठेवला होता. अखेर शिंदे गटाने नाशिक आणि ठाणे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.