आमदार मंगेश चव्हाण यांनी पार पाडले मामाचे कर्तव्य…

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील १३०० हुन अधिक संख्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना मी माझी बहिण मानले आहे. म्हणून त्यांच्या एका मुलीच्या लग्नाला मामा या नात्याने २५ हजार रुपयांची मदत करण्याचा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या भाऊबीज सोहळ्यात दिला होता. दिलेला शब्द पाळत दि.५, ६ व ७ फेब्रुवारी २०२२ रोजी विविध ठिकाणी पार पडलेल्या तिरपोळे, वलठाण, ओझर येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मुलींच्या विवाह सोहळ्याला आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांनी भेट देऊन प्रत्येकी २५ हजार प्रमाणे एकूण ७५ हजारांचा आहेर भेट दिला व आपले मामा म्हणून कर्तव्य पार पाडले.

सदर विवाह सोहळ्याप्रसंगी पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्रभाऊ राठोड, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा चाळीसगाव तालुका कोषाध्यक्ष नवल पवार, भाजपा तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, कैलास पाटील, राम पाटील, जितेंद्र पाटील, बाजीराव अहिरे आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या या अभिनव उपक्रमाला स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – शुभमंगल कर्तव्य योजना” असे समर्पक नाव दिले असून सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एक दातृत्ववान मामाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्या भाचीला दिलेल्या या आहेराची तुलना पैश्यांमध्ये करता येणार नसून त्यामागील प्रामाणिक भावना महत्वाची असल्याच्या प्रतिक्रिया समाजाच्या प्रत्येक स्तरातून व्यक्त होत आहेत. अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती करताना विधवा, परित्यक्त्या यांना शासन प्राधान्य देत असल्याने बहुतांश महिला या सर्वसामान्य कुटुंबातील व निराधार असतात. अतिशय हलाखीत आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण करतात. या सर्व टप्प्यात विशेषतः विधवा अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना पितृछत्र हरवलेल्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी पार पाडणे हे दिव्यच असते, अश्या सर्व परिस्थितीत या जबाबदारीच्या क्षणी आमदार मंगेश चव्हाण यांचा भाऊ म्हणून त्यांना आधार मिळत असल्याने व २५ हजार रुपयांची ठोस मदत मिळत असल्याने मुलीच्या लग्नासाठी येणारा आर्थिक भार देखील यामुळे निश्चितच हलका होत आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आवाहन केल्यानुसार यावर्षी मुलीचे लग्न असणाऱ्या चार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे अर्ज त्यांच्या जनसेवा कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यापैकी तिरपोळे येथील अंगणवाडी मदतनीस ज्योती सूर्यवंशी यांच्या मुलीचे लग्न दि.५ फेब्रुवारी रोजी तिरपोळे येथे, वलठाण येथील अंगणवाडी सेविका सरिता एकनाथ राठोड यांच्या मुलीचा विवाह दि.६ फेब्रुवारी रोजी फौजदार ढाबा, कोदगाव चौफुली येथे तर ओझर येथील अंगणवाडी सेविका ज्योती श्रावण पवार यांच्या मुलीचा विवाह दि.७ फेब्रुवारी रोजी चिखल ओहोळ ता. मालेगाव येथे पार पडला. सदर तीनही विवाह सोहळ्यांना आमदार मंगेश चव्हाण व प्रतिभाताई चव्हाण यांनी भेटी देत नवं वधू वराना शुभेच्छा दिल्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शुभमंगल दातृत्व योजनेतून प्रत्येकी २५ हजारांचा आहेर भेट दिला. तर दि.११ फेब्रुवारी रोजी दस्केबर्डी येथील अंगणवाडी मदतनीस सिंधुताई चिंधा अहिरे यांच्या मुलीचा विवाह दस्केबर्डी येथे आहे तेथे व यावर्षी अजून जे अर्ज प्राप्त होतील त्यांना सदर आहेर दिला जाणार आहे.

राज्य शासनाने नुकताच नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्याचप्रमाणे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील १३०० हुन अधिक संख्या असणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एका मुलीच्या विवाहासाठी २५ हजार रुपयांचा आहेर देण्यासाठी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शुभमंगल कर्तव्य योजना” नुसती घोषीत नाही केली तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू केली. त्याच धर्तीवर राज्य शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने अतिशय तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या राज्यातील सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मुलींच्या विवाहासाठी किमान ५१ हजार रुपये मदत देणारी योजना सुरू करावी अशी मागणी समाजमाध्यमातून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.