भाजप खासदारांच्या पुनर्वसनाचे काय ?

0

लोकशाही संपादकीय लेख  

 

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेला काही महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षातर्फे लोकसभा निवडणुकी संदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप तर्फे देशात ३०० आणि महाराष्ट्रात ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याचे मिशन भाजपचे सुरू आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ जागांवर भाजप विजयी होण्याचे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रात हमखास निवडून येणार या उमेदवारांचा शोध सुरू आहे. त्यात महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांच्या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर, राम सातपुते आदी नावांच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि खासदार रक्षा खडसे असून दोन्ही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या हालचाली सुरू आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रक्षा खडसे या माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत.

एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. परंतु रक्षा खडसे सासऱ्याबरोबर राष्ट्रवादीत न जाता भाजपमध्येच राहिल्या. रक्षा खडसे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या, तरी आता एकनाथ खडसे यांच्यामुळे त्यांच्या निष्ठेविषयी शंका कुशंका निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपतर्फे त्या हमखास निवडून येतील की नाही, अशी शंका निर्माण झाल्याने त्यांच्या ऐवजी पर्यायी तगडा उमेदवाराच्या शोधात भाजप श्रेष्ठी असल्याचे कळते. रक्षा खडसेंना भाजपची उमेदवारी दिली, तर त्यांचे विरोधात सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी अथवा महाविकास आघाडीचे उमेदवार असले तर भाजपला निवडणूक जिंकणे अवघड जाईल. या भीतीपोटी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा तगडा सामना होऊ शकतो. तसेच झाले तर विद्यमान खासदार रक्षा खडसेंना एकतर संघटनेत पद द्यावे लागेल अथवा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी नव्या मतदार संघाचा शोध घेऊन तेथे उमेदवारी द्यावी लागेल. रावेर लोकसभा मतदारसंघात जामनेर, भुसावळ, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ असून या सहा मतदार संघात भाजपचे गिरीश महाजन यांची लोकप्रियता असल्याने ते येथून सहज विजयी होऊ शकतात असे भाजपला वाटते..

जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार चाळीसगावचे माजी आमदार असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. माजी खासदार ए टी पाटील यांचे ऐवजी जळगाव मतदार संघात २०१९ मध्ये माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली होती. परंतु ऐनवेळी स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना जळगाव लोकसभा उमेदवारी देण्यात आली. उन्मेष पाटल चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून २०१९ ला दुसऱ्यांना निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. तथापि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेल्या मंगेश चव्हाण यांना चाळीसगाव विधानसभेची जागा देण्यासाठी उन्मेष पाटलांना जळगाव लोकसभेची उमेदवारी दिली गेली.

सध्या खासदार उन्मेष पाटील यांचे संबंध देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी खास मर्जीचे आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभेच्या जागेसाठी नव्या चेहऱ्याची चाचपणी सुरू आहे. तसे झाले तर खासदार उन्मेष पाटलांचे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटील हे एकेकांचे कट्टर मित्र होते. तथापि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत स्वतःच्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून खासदार उन्मेष पाटलांनी केलेल्या प्रयत्नानंतर या दोघातील मैत्रीत दुरावा निर्माण झाला असल्याने भाजपमध्ये खासदार उन्मेष पाटील साईड ट्रॅक झालेले आहेत. त्यामुळे जर जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, तर खासदार उन्मेष पाटील गप्प बसून राहतील काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.