जळगाव लोकसभेसाठी भाजपा उमेदवार बदलणार

0

संपादकीय

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. देशासह महाराष्ट्रात सर्वच पक्षातर्फे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप महायुतीने जोरदार कंबर कसली असून एकूण ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ पेक्षा जास्त महायुतीतर्फे जिंकल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर तीन पक्षांच्या महाविकास आघाडीतर्फेही जोरदार कंबर कसली आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे एकास एक उमेदवार देण्याची व्यूहरचना केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभेच्या जागा गेल्या २० वर्षापासून भाजपकडे आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागा भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नात राहतील, यात शंका नाही. त्यासाठी निवडून येणारा उमेदवार या दोन्ही मतदारसंघात देण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील. जळगाव व रावेर दोन्ही मतदार संघातर्फे रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना २०२४ साठी उमेदवारी देण्यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे. रक्षा खडसे यांच्या ऐवजी पर्यायी उमेदवाराच्या शोधात गंभीरपणे विचारमंथन सुरू असल्याचे कळते. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या ऐवजी पर्यायी उमेदवार देण्या संदर्भात भाजप श्रेष्ठींचा शोध सुरू असल्याचे कळते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी अधिकृतरित्या पक्षातर्फे जाहीर करण्यात आली होती. स्मिता वाघ यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. परंतु ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी स्मिता वाघ यांनी उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. स्मिता वाघ यांचे पती कै. उदय वाघ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द लक्षवेधी होती. स्मिता वाघ आणि कै. उदय वाघ हे जोडपे भाजपचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. स्मिता वाघ यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले असून त्या विधान परिषदेच्या आमदारही होत्या. त्यामुळे भाजपतर्फे त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती. तथापि चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांना आमदारकीची उमेदवारी देण्याकरता उन्मेष पाटलांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. आमदार मंगेश चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी असल्याने चाळीसगाव विधानसभेची जागा त्यांच्यासाठी ठेवून उन्मेष पाटलांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली.

२०२४ च्या लोकसभेसाठी भाजपतर्फे उन्मेष पाटील हे दावेदार आहेत. तथापि खासदार उन्मेश पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या २०१९ पर्यंत असलेल्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला असून मंगेश चव्हाण व खासदार उन्मेष पाटील यांच्यातील दुरावा सर्वश्रुत आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी रद्द झाल्याने स्मिता वाघ यांच्यावर फार मोठा अन्याय झाला अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांना न्याय देण्यासाठी जळगाव लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी स्मिता वाघ यांच्या नावाचा विचार व्हावा असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यातच आमदार मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यांचे जमत नसल्याने निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून २०२४ साठी स्मिता वाघ यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या महिला उमेदवारा ऐवजी पुरुष उमेदवाराला प्राधान्य दिले गेले तर जळगाव लोकसभेसाठी महिला उमेदवार म्हणून देखील स्मिता वाघ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. शेवटी भाजपच्या अंतर्गतच हा प्रश्न असल्याने पक्षातर्फे कोणता निर्णय होऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी २०२४ च्या निवडणुकीसाठी खासदार उन्मेष पाटलांना उमेदवारी दिली जाते की त्यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिला जातो, हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.