शाही मलाई बोटी बिर्याणी

0

लोकशाही विशेष लेख

 

अस्सल खवय्ये असाल तर मग जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील पदार्थांचा आस्वाद घेता आला पाहिजे. मग तिथं तुम्ही कोणत्या कॅटॅगरी मध्ये येता ( शाकाहारी किंवा मांसाहारी) हे महत्त्वाचं नसतं. आपण नेहमी बिर्याणी (Biryani), हैद्राबादी बिर्याणी (Hyderabadi Biryani), मोगलाई बिर्याणी (Moglai Biryani) असे बरेच प्रकार पाहिले असतील आणि आस्वाद देखील घेतला असाल. आज अगदी हटके अशी “शाही मलाई बोटी बिर्याणी” (Shahi Malai Boati Biryani) चा आस्वाद आपण घेणार आहोत.
पूर्व तयारी करीता वेळ: १५ मिनिटे
पाककला वेळ: ३० मिनिटे
सर्व्हिंग: ५

मलाई बोटीसाठी साहित्य:

१. बोनलेस चिकन १ किलो
२. दही १ कप व क्रीम १/२ कप
३.हिरव्या मिरच्या १ टेस्पून बारीक चिरून
४. लिंबाचा रस १ टेस्पून
५. काळी मिरी पावडर १ टीस्पून
६. पांढरी मिरी पावडर १ टीस्पून
७. तेल ४ टेस्पून
८.आले लसूण पेस्ट २ टेस्पून
९. जिरे पावडर १/२ टीस्पून
१०. धने पावडर १/२ टीस्पून
११. मीठ १ टीस्पून
१२. तेल १ टेस्पून
१३. बदाम आणि काजू पेस्टसाठी बदाम आणि काजू प्रत्येकी १५ घ्यावे.

बिर्याणी मसालासाठी साहित्य

तेल १/४ कप, कांदा २ वाटी बारीक चिरलेला, तमालपत्र १, आले लसूण पेस्ट २ टीस्पून, स्टार बडीशेप २, दालचिनीच्या २, लवंगा ५-६, मोठी वेलची २, काळी मिरी १०/१२, जिरे २ टेस्पून, जिरे पावडर २ टीस्पून, ब्लॅक पेपर पावडर १ टीस्पून, व्हाईट पेपर पावडर १ टीस्पून, धना पावडर १ टीस्पून, पाणी आवश्यकतेनुसार, चवीनुसार मीठ, दही २ वाट्या, मलई १ कप, हिरव्या मिरच्या १०/१२, बदाम काजू पेस्ट ४/५ चमचे

तांदूळ उकळण्यासाठी साहित्य

भिजवलेले तांदूळ ८०० ग्रॅम, तमालपत्र १, लवंगा ३-४, दालचिनी २, मीठ १ टीस्पून, तेल १ टेस्पून, पाणी ४ कप

तांदुळ उकळून घेण्यासाठी

१. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात तमालपत्र, लवंगा, दालचिनी, मीठ, तेल घालून पाणी उकळून घ्या.
२. भिजवलेले तांदूळ उकळलेले पाण्यामध्ये घालून तांदुळ अर्धवट शिजवून घ्यावे. आणि गाळून बाजूला काढून ठेवावे.

मलाई बोटी कृती

१. एका भांड्यात चिकन, दही, मलई, हिरव्या मिरच्या बारीक चिरून, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, पांढरी मिरी पावडर, तेल, आले लसूण पेस्ट, मीठ, जिरे, धणे पूड घालून चांगले मिक्स करा. ३० मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
(प्रमाण साहित्यामध्ये सांगितले आहे.)
२. एका पॅनमध्ये तेल गरम करून आणि मॅरीनेट केलेले चिकन १५ मिनिटे शॅलो फ्राय करून घ्यावे.
३. या शॅलो फ्राय केलेल्या चिकनला कोळशाच्या धूराचा दम देऊन झाकण लावून ठेवून द्यावे.

बिर्याणी मसाला कृती
१. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा घालून लालसर होईपर्यंत तळून घ्यावा.
२. आता त्यात तमालपत्र, लवंगा, स्टारफूल, बडीशेप, दालचिनी, काळी मिरी, काळी वेलची घालून परतवून घ्या.
३. आता आले लसूण पेस्ट घालून २/३ मिनिटे परतवून घ्यावे.
४. मीठ, पांढरी मिरी पावडर, जिरे, काळी मिरी पावडर, जिरेपूड, धनेपूड घालून आणखी २/३ परतवून घ्यावे.
५. पाणी घालून झाकण ठेवा. ५ मिनिटे शिजवा. आता त्यात दही, बदाम काजू पेस्ट घालून मिक्स करा. आता क्रीम, हिरव्या मिरच्या घालून २-३ मिनिटे शिजवा. तुमचा बिर्याणी मसाला तयार आहे.

थर लावण्यासाठी साहित्य
१. आवश्यकतेनुसार बिर्याणी मसाला
२. आवश्यकतेनुसार उकळलेले तांदूळ
३. आवश्यकतेनुसार मलाई बोटी
४. आवश्यकतेनुसार तळलेला कांदा
५. आवश्यकतेनुसार काळी मिरी पावडर
६. आवश्यकतेनुसार पुदिन्याची पाने व कोथिंबीर (बारीक चिरलेली)
७. आवश्यकतेनुसार लिंबाचा रस

मलाई बोटी बिर्याणी कृती

१. प्रथम एका भांड्यात तयार बिर्याणी मसाल्याचा थर घाला, त्यावर उकडलेले तांदूळ घाला आणि काळी मिरी पावडर शिंपडा.
२. पुन्हा बिर्याणी मसाला घाला. तयार मलाई बोटी आणि उरलेला उकडलेला भात. काळी मिरी पावडर शिंपडा.
३. तीन ते चार लेअर मध्ये बिर्याणी थर लावून घ्या.
४. तळलेला कांदा, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून सजवा आणि १५ मिनिटे वाफवून घ्या.
५. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर,तळलेला कांदा, आणि कोशिंबीर वाढून खायला द्या.

टीप:
शाही मलाई बोटी बिर्याणी बनवताना पदार्थांचे माप आणि कृती आहे तशा पद्धतीने बनविल्यास ती अचूक बनेल.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.