बाजार समिती निवडणुकीवर राजकीय हालचालीचे सावट

0

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर २८ एप्रिलला मतदान होणार असून, २० एप्रिल रोजी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल तयार करण्यासाठी महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे स्वतंत्र पॅनल तयार करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीसाठी हालचालीमुळे जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत संभ्रम निर्माण झाला आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी तसेच शिंदे शिवसेना भाजपचे पॅनल बनवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असताना मुंबईतील राजकीय हालचालींचा बाजार समिती निवडणुकीवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भाजपच्या जवळीकतेमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी होत आहे. विशेषतः चोपडा बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एडवोकेट घनश्याम पाटील (Advocate Ghanshyam Patil) यांनी बाजार समितीतील अरुण भाई गुजराती यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या विरोधात स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीत आहेत. चोपडा सहकारी साखर कारखान्यातील चेअरमन पदासाठी एडवोकेट घनश्याम पाटील इच्छुक होते. त्यांना कारखान्याचे चेअरमन करण्याचे आश्वासन सुद्धा अरुण भाई गुजराती (Arun Bhai Gujarati) यांनी दिले होते. तथापि ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. म्हणून घनश्याम पाटील बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीत असल्याचे कळते. एडवोकेट घनश्याम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात स्वतंत्र पॅनल करण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळते. त्यामुळे 20 एप्रिलच्या उमेदवारी माघारी घेण्याच्या तारखेनंतर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तीच परिस्थिती अमळनेर बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. कारण भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ (Smita Vagh) आणि माजी आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhary) यांच्या नेतृत्वात स्वतंत्र पॅनल होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या हालचालीनंतर आमदार अनिल पाटील कोणती भूमिका घेतात याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमधील हालचालीमुळे जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीवर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाचोरा भडगाव बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलची घोषणा झाली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ (Dilip Wagh) महाविकास आघाडी पॅनल मध्ये कायम राहतील की वेगळी भूमिका घेतात याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आलेले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भाजप सोबत स्वतंत्र पॅनल करण्याची घोषणा केली असली तरी पाचोरा तालुक्यातील भाजपचे शिंदे गट भाजपचे स्वतंत्र पॅनल करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यामुळे पाचोरा भडगाव बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे एक पॅनल, किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांचे दुसरे, तर भाजपचे तिसरे पॅनल होण्याची शक्यता आहे. सध्या आमदार किशोर आप्पा पाटील हे जपान दौऱ्यावरून परत आल्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होईल. यापूर्वी सुद्धा जळगाव जिल्हा सहकारी बँक चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांनी बंडखोरी करून चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चेअरमन पदाचे उमेदवार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील यांचा एकमताने पराभव झाला होता. संजय पवार यांनी सुद्धा अजित पवार यांच्या आशीर्वादाने बंडखोरी केल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा बँक निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या हालचालीचे संकेत मिळत होते. त्यामुळे आता बाजार समिती निवडणुकीवर कसा परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्वच पक्षाचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मात्र संभ्रमित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीच्या हालचालीचे सावट बाजार समिती निवडणुकीवर दिसून येत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.