प्रवाशांना रेल्वेस्थानकावर मिळणार २४ तास वैद्यकीय सेवा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
डीआरएम एस.एस.केडिया यांच्याहस्ते भुसावळच्या जंक्शन रेल्वे स्थानकावर ईएमआर (इर्मजन्सी मेडीकल रूम) चा शुभारंभ मंगळवारी दुपारी चार वाजता करण्यात आला. भुसावळ विभागात सर्वप्रथम शहरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आगामी काळात विभागातील सहा रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशाची प्रकृती खालावल्यास वा बिघडल्यास तसेच रेल्वे स्थानकावर प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आता सुलभ होणार असून 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे.

देशभराच्या कानाकोपर्‍यातून धावणार्‍या अनेक रेल्वे गाड्यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा आहे. मात्र प्रवासाच्या कालावधीत एखाद्या प्रवाशाची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती शिवाय रेल्वे स्थानकावरदेखील एखाद्या प्रवाशाची तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज भासल्यास त्यास रेल्वे दवाखान्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता रेल्वे स्थानकावरही 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तीन सत्रात डॉक्टर उपलब्ध असणार असून त्यासाठी रेल्वे बोर्डाने ठरलेल्या दरानुसार आकारणी करण्यात येणार आहे.

भुसावळ विभागातील बडनेरा, अकोला, जळगाव, खंडवा, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांचा पहिल्या टप्यात समावेश असून या रेल्वे स्थानकावरील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सर्वात आधी भुसावळ रेल्वे स्थानकावर हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.