भुसावळ-देवळाली मेमू, भुसावळ-वर्धा पॅसेंजर गाडयांना हिरवा कंदील

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनाच्या निर्बंधांमुळे गत अडीच वर्षांपासून बंद केलेल्या भुसावळ-देवळाली मेमू आणि भुसावळ-वर्धा दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांना रेल्वे प्रशासनाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देवळाली मेमू १५ सप्टेंबरपासून धावणार आहे. तर भुसावळ वर्धा पॅसेंजर १६ सप्टेंबरपासून धावणार आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळात रेल्वे प्रशासनातर्फे पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सर्वसामान्यसह चाकरमान्यांचे हाल होत होते. रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना कमी झाल्यानंतर  टप्प्याटप्प्याने अनेक मेल एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र त्यात सर्वसामान्यांची आधार असलेली पॅसेंजर बंदच होती. त्यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. अशातच भुसावळ येथून सुटणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरु करण्यात येत आहे.

अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ-देवळाली (गाडी क्र. ११११४) शटल पुन्हा सुरू केली जात आहे. भुसावळ जंक्शनवरून ही गाडी १५ सप्टेंबर पासून धावेल. तर देवळाली येथून ही गाडी १६ सप्टेंबरला सुटणार आहे. मात्र या गाडीच्या धावण्याच्या वेळेत रेल्वे प्रशासनाकडून बदल केला आहे. भुसावळ येथून देवळाली मेमू ही गाडी आता सायं. ५.२० ऐवजी ५.३० ला सुटेल. तसेच ही गाडी पॅसेंजर ऐवजी मेमू ट्रेनच्या स्वरूपात धावणार असून भाडेही जास्त असू शकते. त्यामुळे प्रवाशांना याचा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.

तसेच भुसावळ-वर्धा-भुसावळ (गाडी क्रमांक १११२१) ही गाडी १५ सप्टेबर ऐवजी १६ रोजी सुटणार आहे. तर वर्धा येथून १७ रोजी सुटेल. या दोन्ही गाड्या पूर्ववत सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे गाड्या सुरू होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.