घरकुल मिळण्यासाठी दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्षांचे उपोषणाला सुरुवात

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव नगरपरिषद हद्दीत जागा उपलब्ध करून त्या जागी घरकुल बांधून देणे या मागणीसाठी भडगाव तालुका अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत धोबी यांनी आज पासुन गिरणा नदी पात्राच्या बाजूला असलेल्या गिरणा पंपिंग हाऊस जवळ आमरण उपोषणाला बसले असून, प्रशासनाने दोन दिवसात दखल न घेतल्यास गिरणानदी पात्रात जल समाधी घेणार असल्याचे भरत धोबी यांनी यावेळी सांगितले.

या बाबत अधिक महिती अशी की, भरत किसन धोबी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.०१/०३/२०१७ या वर्षी घरकुल योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे दिलेले आहेत. माझ्या सोबतच्या अपंग बांधवांचे घरकुल मंजूर करून बांधकाम करून देण्यात आलेले आहे. माझे घरकुल का मंजूर करण्यात आले नाही? या विषयी नगरपरिषदेत जाऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते उडवा उडवीचे उत्तरे देतात. मला पत्नी व दोन मुले आहेत. आम्ही दोघे पती पत्नी अपंग आहोत. माझ्याकडून कुठलेही काम होऊ शकत नाही. सद्य परिस्थितीत आम्ही भाड्याच्या घरात राहतो.

तरी महाशयांनी माझ्या या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व मला न्याय मिळवून द्यावा. माझ्या सोबतचे अपंग बांधवांचे घरकुल बांधले आहेत आणि ते त्यांच्या बांधलेल्या घरकुलात परिवारासह आनंदी राहत आहे. मला नगरपरिषदेने त्वरित घरकुल मंजूर करून बांधकाम करून देण्यात यावे व मला न्याय द्यावा. मला घरकुल मंजुरीचे पत्र न दिल्यास २५/०९/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता भडगाव नगरपरिषदेच्या गिरणा नदी पंपिंग स्टेशनच्या आवारात आमरण उपोषणास बसणार आहे. तरी माझे काही बरे वाईट झाल्यास भडगाव नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आण्णा मोरे, अपंग संघटनेचे सचिव संजय सोनवणे, राजु वाणी,यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.