भडगाव तालुक्यात एक महिनाभरापासून पाऊस नाही, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण तालुक्यात पावसाने डोळे वटारून पाठ फिरवली असून, यापूर्वीही दोन महिन्यात अल्पसा पाऊस असल्याने तालुक्यात कोरडया दुष्काळाचे सावट व बिकट वाईट परिस्थिती निर्माण झाल्याने, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शासनाने तात्काळ भडगाव तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत व नुकसान भरपाई, कर्ज माफी व पिकविमा, फळपिक विमा जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी करावा अशी मागणी माजी जि.प.सभापती विकास तात्या पाटील व पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पी ए पाटील यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली आहे.

यावर्षी तालुक्यात पावसाळ्या ऋतूत सुरुवातीपासून पावसाळा लहरी पणाचा दिसून आला कशीबशी पेरणी झाली. त्यावर देखील पुरेसा पाऊसच नाही संपूर्ण जून कोरडाठाक गेला, ६ जुलैला पाऊस आला पण तो देखील रिमझिम होता. कसेबसे पिकांना जीवनदान मिळाले पिकं तग धरून होती. रिमझिम पाऊसावर पिके तरारली पण, शेतात बेसुमार अवास्तव तणगवत वाढले ते गवत वाढती मजुरी देऊन कसेबसे काढले व आंतरमशागत केली. महागडे रासायनिक खते दिली औषध फवारणी केली. पण यावर पाऊस आला नाही. ऐन पिक वाढीच्या मौसमात साधारण एक महिन्यापासून पाऊस नसल्याने कडधान्ये पिके पाण्याअभावी यांना फुलोरा आलाच नाही, आला तर जेमतेमच आला. यामुळे कडधान्ये शंभरटक्के उत्पन्न बुडाले आहे. मे महिन्यात विहिरीच्या पाण्यावर व ठिंबक सिंचनावर लागवड केलेल्या कपाशीला शेतकऱ्यांनी पाणी देऊन वाचविले. पण कपाशीला फुल फुगड, पातेफुले पाहिजे त्या प्रमाणात आली नाही. आली तर जेमतेमच दिसत आहे. कारण पाऊस अभावी सर्व निसर्गचक्र कोलमडून पडले पावसावर अवलंबून असलेल्या कपाशी मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन आदी पिके लावालाच शेतात उभी दिसत आहे.

ऐनवाढीच्या काळात पाऊस आला नाही. आता पावसाळा ऋतूला तीन महिने एवढा मोठा कालावधी जाऊन पाऊस नाही. तीन महिन्यात शेतातून पाणी बाहेर पडले नाही. जमीन तहानलेल्या अवस्थेत आहे. शेतशिवारातील छोटे मोठे नाले ओढे, नदी कोरड्या अवस्थेत दिसत असून ते खळखळून वाहीली नाहीत. पुढील काळात विहिरींना पाणी वाढेल कसे? अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पुढे रब्बी हंगाम कसा येईल? अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गांव परिसरात तालुक्यात गिरणा नदी देखील दोन महिन्यापासून वाहीली नाही. एका बाजूला पाऊस नसल्याने दु:ख तर दुसऱ्या बाजुने गिरणामाई देखील कोरडी पडली आहे. पुढील आठ महिने गुरांढोराना चारा पाणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून भडगाव तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी बरोबर शेतकऱ्यांना पिकविमा, फळविमासाठी रक्कम जाहीर करून नुकसान भरपाई दयावी. अशी मागणी विकास पाटील व पी ए पाटील यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.