बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्हीही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी नक्की वाचा.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला असून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे.  RBI  बँकेला त्यांच्या अ‍ॅपसंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ऑफ बडोदाला त्यांच्या मोबाईल अ‍ॅप ‘बीओबी वर्ल्ड’ वर नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली आहे. म्हणजेच आता नवीन ग्राहकांना अ‍ॅप जॉइन करता येणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने म्हटलंय की अ‍ॅपवर ग्राहकांचा समावेश करण्याच्या पद्धतींबाबत काही त्रुटी दिसल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जुन्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणे अ‍ॅपद्वारे व्यवहार करता येणार आहेत.

आरबीआयने निवेदनात दिल्यानुसार,  बँक ऑफ बडोदाला ‘बॉब वर्ल्ड’ मोबाइल अ‍ॅपवर नवीन ग्राहक जोडण्याची प्रक्रिया त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘बीओबी वर्ल्ड’ अ‍ॅपवर बँकेच्या ग्राहकांना जोडण्याची कोणतीही प्रक्रिया बँकेने आढळलेल्या कमतरता दूर केल्यानंतर आणि संबंधित प्रक्रिया मजबूत केल्यानंतर आणि आरबीआयचे समाधान झाल्यानंतरच होईल. या निलंबनामुळे सध्याच्या ‘बीओबी वर्ल्ड’ ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही आरबीआयने बँकेला दिले आहेत.

बँक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयच्या चिंतेचं निराकरण करण्यासाठी त्यांनी आधीच सुधारणा केल्या आहेत. सापडलेल्या उर्वरित कमतरता दूर करण्यासाठी पुढील पावलं उचलली गेली आहेत. ग्राहकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असं आश्वासनही बँकेने दिलंय. तसंच, बीओबी वर्ल्ड मोबाईल अ‍ॅपवर कोणत्याही अडचणीशिवाय सर्व्हिस वापरणं सुरू राहील. नेट बँकिंग, व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग, डेबिट कार्ड, एटीएम यांसारख्या इतर डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मवर सध्याच्या ग्राहकांच्या सेवांसह नवीन ग्राहक जोडण्यावर या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही, असं बँकेने म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.