आयुर्वेदाचा संक्षिप्त इतिहास : भाग पाच

0

लोकशाही विशेष लेख

भूत विद्या ही सुद्धा आयुर्वेद शास्त्राचा एक भाग आहे. तन्मात्रांचा दुसरा सर्ग हा भूतसर्ग आहे. (संदर्भ – महाभारत शांतीपर्व २८०.२० नीलकंठ भट्ट टीका) तन्मात्रा यांचे कार्य व जे सूक्ष्म तत्व त्याला भूत तत्व असे म्हणतात. प्राकृतिक नियमांच्या उल्लंघनाने सूर्य चंद्रादिकांचा सूक्ष्म प्रभाव मनुष्य शरीरातील तन्मात्रांवर पडतो व त्यावेळी अनेक रोग उत्पन्न होतात असे चरकाचार्यांनी वर्णन केले आहे. (संदर्भ. नि. ७.१३)आयुर्वेद शास्त्रामध्ये अगद शब्दाला पारिभाषिक अर्थ प्राप्त झाला आहे. आचार्य डल्हणाने अगदतंत्राची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.

“अगदो विष प्रतिकार स्तदर्थ तन्त्रम् अगदतन्त्रम्”
अर्थ – विविध विषांच्या शमनाचे उपाय सांगणारे तंत्र ते अगद तंत्र होय. काश्यप उशना व बृहस्पती हे तिघेही अगद तंत्राचे आचार्य होते. याशिवाय आलेवामन हे सुद्धा एक अगद तंत्रज्ञ होते. यांचा काल भारतीय युद्धाच्या अगोदरचा असावा. सुश्रुत संहितेच्या कल्पस्थानावरील डल्हणाच्या व्याख्येत जागोजागी आलंबायानाची वचने उधृत केलेले आहेत. याशिवाय दारूवाह किंवा नग्नजित व आस्तिक हे सुद्धा अगदतंत्राचे विशारद होते.
आयुर्वेदिक शास्त्राचे सर्वात प्रभावी अंग म्हणजे रसतंत्र होय. या रसतंत्रात अनेक आयुष्ययोग उधृत केलेले आहेत. सुश्रुत संहितेत रसायनतंत्राची व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत.

“रसायन तन्त्र नाम वय स्थापनमायुम्रे धाबलकर रोगापहारण समर्थच”
अर्थ – रसायन तंत्र हे शंभर किंवा त्याहून जास्त वर्ष आयुष्य देणारे बुद्धि बल वाढवणारे व रोगांचा अपहार करणारे आहे.
अनेक ऋषी योग बल व रसायन बल यांच्या योगाने दीर्घायुष्य बनले आहे. भगवान शिव हे रसतंत्राचे प्रधान आचार्य आहेत. भृगु, अगस्ती व वशिष्ठ हे सुद्धा रसायन तंत्राचे आचार्य होते. यांच्यानंतर आचार्य मांडाव्य यांचे रसतंत्रात विशेष असे स्थान आहे. या व्यतिरिक्त व्याडी, पतंजली, नागार्जुन हे सुद्धा प्रसिद्ध रसतंत्रकार होते. नागार्जुन या रसशास्त्रज्ञानी रसशास्त्रावर लोहशास्त्र, रसरत्नाकर, कक्षपुटम, आरोग्यमंजुरी, योगसार, रसेद्रमंगल, रतिशास्त्र, रसकच्छपुट, सिद्धनागार्जुन असे ग्रंथ लिहिले आहेत.

या व्यतिरिक्त अष्टांगसंग्रह कार वृद्ध वागभट्ट, अष्टांगहृदयकर्ता वाग्भट रुग्वीनिश्चय किंवा माधवनिदान या ग्रंथाचे कर्ते माधवकर, चक्रपाणीदत्त, बंगसेन, मिल्हण, बोपदेव, लोलिबराज, सुरेश्वर, नरहरी, मदनपाल, पृथ्वीमल्ल, विश्वनाथसेन, मोरेश्वर इ. अनेक आयुर्वेद शास्त्राचे ग्रंथकार होऊन गेले.

द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत अध्यापक
जळगाव
0257-2236815

Leave A Reply

Your email address will not be published.