लोकशाही विशेष लेख
उपनिषदांच्या रूपाने मौलिक तत्त्वचिंतनास प्रारंभ झाला. विरक्त व सिद्ध योग्यांचा उदयकाल झाला. यज्ञप्रधान वैदिक संस्कृती व वैदिकेतरांची संस्कृती यांच्या संघर्षातून उपनिषदांतील तत्त्वज्ञान निर्माण झाले. प्राचीन भारतीयांच्या ज्ञानविकासातील अत्यंत महत्त्वाचे क्रांतिकारक युग म्हणजे उपनिषद्काल हे होय. उपनिषदांत विशाल, भव्य आणि शुद्ध कल्पनांचे सर्जन कार्य दिसून येते.
उपनिषदांचे लेखन बांधीव स्वरूपाचे नाही; त्याचप्रमाणे त्यात कल्पनांची संगतवार व्यवस्थित मांडणीही नाही. उच्च विचारांचे ते प्राथमिक आविष्कार आहेत. उपनिषद्कालीन समाज हा यज्ञविषयक कर्मकांडालाच परम धर्म मानीत होता आणि इह- परलोकातल्या वैषयिक सुखोपभोगासाठी आसुसलेला होता. उपनिषदकर्त्यांनी या समाजापुढे निराळे आदर्श उभे केले, धर्माचे सूक्ष्म स्वरूप त्यांना दाखविले आणि सांगितले, की जीवनातील श्रेष्ठ सुख भोगांत नसून त्यागात आहे. जन्ममरणांतून सुटणे, हीच मानवमात्राची खरी समस्या असून, मोक्ष हे तिचे अंतिम आणि एकमेव उत्तर आहे.
यासाठी उपनिषदांनी सदाचाराचा आदेश दिला, सद्गुणांची आवश्यकता प्रतिपादिली, त्याग आणि तपस्या यांचा महिमा सांगितला आणि ब्रह्मज्ञान हीच जीवनाची कृतार्थता होय असा उद्घोष केला. उपनिषद् ग्रंथ हे भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलस्रोत असून, प्राचीन भारतीयांच्या तात्त्विक विचारांची सर्वोच्च अवस्था उपनिषदांत दिसून येते.
ऋषी व आचार्य- उपनिषत्कालीन ऋषि-मुनी व आचार्य यांच्याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्या थोर महात्म्यांच्या जीवनावर कालाचा पडदा पडला आहे. उपनिषदांत असे कितीतरी मंत्र आहेत, की त्यांचा कर्ता अमका तमका ऋषी आहे, असे सांगता येणार नाही. तथापि ज्या थोड्या स्त्री-पुरुषांची नावे उपनिषदांत आढळतात, त्यांत अध्यात्म- पारंगत या दृष्टीने याज्ञवल्क्य हा सर्वांचा मेरुमणी ठरतो. जनकाच्या दरबारातल्या विद्वत्परिषदेत याज्ञवल्क्याचा जो अमृतमय वाक्स्रोत वाहिला, त्यात तिथले सर्व विद्वान मज्जन करून पावन झाले. त्याला प्रतिप्रश्न करायला कोणाची छातीच होईना. शेवटी गार्गीने तिथल्या ऋषींना आणि आचार्यांना असा सल्ला दिला, की ‘तुम्ही नमस्कार करून या ब्रह्मवेत्त्या- पासून आपली सुटका करून घ्या. तुमच्यापैकी कोणीही या ब्रह्मवेत्त्याला जिंकू शकणार नाही’.
याज्ञवल्क्यानंतर आरुणी, सनत्कुमार, रैक्व, शांडिल्य, ऐत-रेय, दधीच, इ. विद्वान आचार्यांची नावे दिसतात. मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी यमाच्या दरबारात जाऊन त्यालाच आपला गुरू करणारा कुमार नचिकेत आणि विद्याप्राप्तीासाठी गुरुगृही पडतील ते कष्ट सोसणारा सत्यकाम जाबाल हे दोघे उपनिषदांतले आदर्श ब्रह्मचारी होत. उपनिषदांत पुरुषांबरोबरच ब्रह्मवादिनी अशा दोन स्त्रियाही आढळतात. गार्गी आणि मैत्रेयी ही त्यांची नावे होत.
आत्मा आणि ब्रह्म- पिंडात असलेला आत्मा व ब्रह्माण्डाच्या बुडाशी असलेले ब्रह्म ही दोन्ही एकच होत, असा उपनिषद्कारांचा सिद्धान्त आहे. आत्मब्रह्मैक्य ही एक गृहीत धरलेली कल्पना नाही; तर मानवी बुद्धी, भावना व इच्छाशक्ती यांच्या स्वरूपाचे विश्लेषण केल्यानंतर त्यातून निघालेला तो अपरिहार्य सिद्धान्त आहे. उपनिषदांत जागृती, स्वप्न, सुषुप्तीअ व तुर्या अशा आत्म्याच्या चार अवस्था मानलेल्या आहेत. त्यांपैकी पहिल्या तीन अवस्थांचा प्रत्येकाला प्रत्यक्षही अनुभव येतो. आत्मविद्येची साधना करील त्याला चौथी अवस्था प्राप्त होते. या अवस्थेत ज्ञाता व ज्ञेय हा भेद उरत नाही. द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटीही मावळते. या अवस्थेतील आत्मा व ब्रह्म ही एकच आहेत. उपनिषदांतील ब्रह्म हे चैतन्यमय व सर्वशक्तिमान असे तत्व असून, तेच सर्वांचे मूळ व सर्वांचा आधार आहे. सच्चिदानंद हे त्याचे स्वरूप आहे. ते स्वयंभू आहे. ज्ञान, बल व क्रिया हा त्याचा स्वभाव आहे.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
अर्थ – ते पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यावर देखील पूर्णच शिल्लक राहते. ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ असे जे तैत्तिरीयात म्हटले आहे, तेही त्या पूर्णब्रह्माचेच पूर्ण वर्णन होय.
द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत भारती, जळगाव
दूरध्वनी नं. 0257-2236815