वकीलपत्र घेण्यावरून न्यायालयातच राडा : पोलिसांचा लाठीमार

न्यायमूर्तींच्या दालनाकडे जाण्याचा मार्गातच वाद : काहीवेळ न्यायालयाचे कामकाज थांबले

0

 

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागातील उमर कॉलनीत गोवंशाची कत्तल करून मांस विक्री प्रकरणी तीन जणांना तर कत्तल केलेल्या गोवंशाचे उर्वरीत मांस आणि शिंगांसह कातडी गोणीत भरुन घेऊन जाणाऱ्या इसमाला शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती.

 

दरम्यान शुक्रवारी २१ जून रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुपारी तीन वाजेदरम्यान न्यायालयात आणले असता दोन्ही गटाचे ४०० ते ५०० कार्यकर्ते न्यायालय परिसरात आले होते. यावेळी एका गटाने वकीलाला धामी दिली. तसेच वकीलपत्र घेण्यावरूनही वाद झाला. हा वाद वाढतच गेल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला.

 

याबाबत सविस्तर असे की, सदर प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत  संपल्याने शुक्रवारी दुपारी आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी ॲड. निरंजन चौधरी हे एका दुसऱ्या वकिला सोबत बोलत होते. या दोघांच्या बोलण्यात नदीम गफ्फार मलिक हा बोलू लागला. त्यामुळे त्यांनी ‘मध्ये बोलू नको’ असे सांगितले. याचा राग आल्याने नदीम मलिकने “तुला पाहून घेईल” असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने वादाची ठिणगी पेटली.

 

न्यायमूर्तींच्या दालनाच्या लगतच वाद

दरम्यान दोन गट एकमेकांसमोर आल्यामुळे वाद अधिकच वाढला. हा संपूर्ण प्रकार न्या. एम.एम. बढे व न्या. केंद्रे यांच्या दालनाकडे जाणाऱ्या मार्गात जिन्याजवळ घडला. यावेळी दोन्ही गट प्रचंड संतप्त असल्याने एकमेकांवर मोठमोठ्याने ओरडून आरोप करत होते. त्यामुळे न्यायालयीन परिसरात गोंधळ माजला होता. परिणामी न्यायालयाचे कामकाजही काही वेळ थांबवण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी ॲड. वकील सुरेंद्र काबरा यांनी दिली.

पोलिसांनी लाठीमार करून पांगवले

दरम्यान हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवा लागला. या प्रकरणात संशयित असलेल्या आरोपींना नेमके न्यायालयात आणायचे असल्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करून त्यांना न्यायालयात आणावे लागेल.

 

यावेळी ॲड. इम्रान शेख यांनी सांगितले की, या प्रकरणात आपण संशयितांची बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र घेत असल्यामुळे वकीलपत्र घेण्यापासून ॲड. निरंजन चौधरी आणि ॲड. केदार भुसारी हे रोखत होते. यावरूनच वाद वाढत गेला असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

दरम्यान याप्रकरणी निरंजन चौधरी यांनी यांनी धमकावण्यात आल्याचे सांगून फिर्याद दिली असून नदीम गफ्फार मलिक यांनी देखील फिर्याद देऊन तक्रार नोंदवली आहे. रात्री नऊ वाजता शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही फिर्यादी विरोधात अदगलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.