विशेष संपादकीय – १
भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी आणि स्वतंत्र्य मिळाल्यानंतर देशातील प्रसार माध्यमे विशेषतः मुद्रित प्रसार माध्यमे अर्थात वृत्तपत्रांमध्ये अमुलाग्र बदल झाला. स्वातंत्र्य मिळण्याआधीची माध्यमांची ध्येयधोरणे आणि स्वातंत्र्यानंतरच्या माध्यमांची ध्येयधोरणे यांच्यातील बदल लक्षणीय असा आहे. इंग्रजीसह विविध प्रादेशिक भाषांमधील माध्यमांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्रातील मराठी भाषिक वृत्तपत्रांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईचे १०५ हुतात्मांचा बळी गेला. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, त्या लढ्याला यश आले पाहिजे, म्हणून १९५५ साली भुसावळचे स्वातंत्र्य सेनानी वामन हरी देशपांडे यांनी लोकशाही हे वृत्तपत्र सुरू केले. १९६० ला संयुक्त महाराष्ट्रची निर्मिती झाल्यानंतर वामन हरी देशपांडे यांनी दैनिक लोकशाहीची मालकी संपादिका या नात्याने माझ्याकडे १९७१ साली सुपूर्द केली. तेव्हापासून ते आतापर्यंत गेली ५३ वर्ष कसलाही खंड न पडता दैनिक लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. भुसावळ येथून प्रसारित होणारे दैनिक लोकशाही, जळगाव येथे जिल्ह्याच्या ठिकाणाहून प्रसारित होऊ लागले.
सुरुवातीला टॅब्युलर आकारात त्यानंतर चार पाने पूर्ण साईज मध्ये कृष्णधवल छपाई, नंतर रंगीत छपाईद्वारे एकूण नियमित सहा पाने व आठ पाने प्रसारित होऊ लागली. वाचकांची आवड आणि मागणी लक्षात घेऊन ऑफसेटद्वारे आकर्षक छपाई करून वाचकांना अंक देण्यात येऊ लागला. गेल्या वीस वर्षात प्रसार माध्यमात झालेल्या बदल म्हणजे दूरदर्शन आदी टीव्ही चॅनेलचे जोरदार आक्रमण झाले. १९९० ते २००० च्या शतकात तर टीव्ही चॅनलने जणू प्रसार माध्यमात केलेले आक्रमण हे मुद्रित माध्यमांसाठी चिंतेचाच विषय बनला होता. तथापि प्रसारमाध्यमात मुद्रित माध्यमे अर्थात प्रसार माध्यमांची विश्वासार्हता कायम राहिली आहे. आणि इतर माध्यमांच्या विश्वासार्हते बद्दल साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे वृत्तपत्रांना मिळणारा वाचकांचा प्रतिसाद कायम आहे. किंबहुना तो वाढतो आहे.
दैनिक लोकशाहीच्या वाचकांची मागणी लक्षात घेऊन मुंबईला ठाणे आवृत्ती आम्ही सुरू केली. जळगाव जिल्ह्यात दैनिक लोकशाहीच्या वाढती मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील विविध समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका दैनिक लोकशाही पार पाडते आहे. जिल्ह्यातील शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतमजुरांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या, उद्योगधंद्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, ग्रामीण तसेच नागरी भागातील समस्या यांना वाचा फोडण्याचे मुख्य कार्य लोकशाही वृत्तपत्र करत आहे. सर्वसामान्यांपासून ते सर्वांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येविषयी जागृतता निर्माण करण्याचे कार्य दैनिक लोकशाहीच्या वार्षिक ‘लोकारोग्य’ या माध्यमातून केले जाते. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘नेक्स्ट जनरेशन’, ‘स्टार्टअप’ आणि ‘विकसित भारत’ यांसारखे विषय घेऊन त्याबद्दल नामवंत लेखकांचे विचार आमच्या वाचकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. राजकारण तर समाजाचा एक अभिन्य अंग बनला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुक कालावधीत ‘लोकोत्सव’च्या माध्यमातून स्वतंत्र नियमित पुरवणीद्वारे देशभरातील राजकारणाविषयी वैविध्यपूर्ण माहिती देण्यात आली. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला..
प्रसार माध्यमांमध्ये सध्या झालेल्या अमुलाग्र बदलाप्रमाणे दैनिक लोकशाही वृत्तपत्र समूहाने सुद्धा बदल स्वीकारला आहे. आमची दुसरी पिढी सुपुत्र राजेश यावलकर यांच्या संचालनाखाली प्रसार माध्यमातील बदल स्वीकारले गेले आहेत. त्यांची ही वाटचाल जोरात सुरू आहे. बदलत्या प्रसार माध्यमांप्रमाणे दैनिक लोकशाहीच्या बदलत्या स्वरूपाविषयी उद्याच्या अंकात चर्चा करू…!
सौ. शांता वाणी, संपादिका