अंगावर रॉकेल टाकून तरुणाची आत्महत्या,धक्कादायक कारण आलं समोर
थेट मृतदेह आणला तहसील कार्यालयात, चौघांवर गुन्हा दाखल
अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क
चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने रॉकेल टाकून जाळून घेतल्याची घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. विलास भाईदास घिसाडी, असे मृताचे नाव आहे. याबाबत चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
डुक्करामूळे झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूड येथील गणेश भाईदास घिसाडी व त्याचा भाऊ विलास भाईदास घिसाडी यांच्या घराच्या मागील बाजूला रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर व सुदाम भुरा वडर राहतात. त्यांची मोकाट डुकरे आजूबाजूच्या घरांमध्ये घुसून अन्न धान्याची नासाडी करतात, म्हणून त्यांच्यात वाद होते. मंगळवारी सकाळी विलास घिसाडी येथे गेले होते. दुपारी तीनला विनोद वडर याच्या डुकरांनी पुन्हा अन्न धान्याची नासाडी केली, म्हणून विलास बोलायला गेला असता, विलासला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.
दरम्यान या चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विलास याने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याने धुळे पोलिसांना चौघांविरुद्ध जबाब दिला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने मृताच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी (ता. २६) मृतदेह तहसील कार्यालयात आणला. मात्र, शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असल्याने मृतदेह आणणारी रुग्णवाहिका बाहेरच थांबविली.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत गणेश घसाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक करण्यात आली. उपनिरीक्षक अक्षदा इंगळे तपास करीत आहेत.