काँग्रेसच ओबीसींचा सर्वात मोठा विरोधक – अमित शाह

0

जयपूर;- काँग्रेस अनसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत  भ्रम निर्माण करत असून, मुळात हा पक्षच ओबीसी समुदायाचा सर्वात मोठा विरोधक आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला. राजस्थानच्या कोटा आणि शक्करगड येथील प्रचारसभांमध्ये ते बोलत होते.

आम्ही ४०० पार बद्दल बोललो की, काँग्रेसच्या पोटात दुखते. त्यामुळे ते भाजपला जिंकला तर आरक्षण संपुष्टात येईल, असे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. गेली दहा वर्षे आमच्याकडे स्पष्ट बहुमत होते. परंतु आम्ही बहुमताचा उपयोग आरक्षण संपवण्यासाठी नाही तर कलम-३७० हटवण्यासाठी, राम मंदिर उभारण्यासाठी, शरणार्थ्यांना नागरिकता देणारा सीएए लागू करण्यासाठी केला. याउलट काँग्रेसने बहुमताच्या जोरावर आणीबाणी लादली, असे शाह म्हणाले. संपूर्ण जगात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी समुदायातून येतात. अशा वेळी भाजप आरक्षण कसे काय संपुष्टात आणू शकतो, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच काँग्रेस हा ओबीसी समुदायाचा सर्वात मोठा विरोधक असल्याचा आरोपही केला. काँग्रेसने काका कालेलकर आयोगाचा अहवाल गायब केला. मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. राजीव गांधींनी संसदेत अडीच तास आरक्षणाच्या विरोधात भाषण केले. त्याउलट मोदींनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. देशातील सर्व केंद्रीय संस्थांमध्ये आम्ही २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू केले. लोहार, सुतार, शिंपी, न्हावी अशा छोट्या छोट्या जातींसाठी

देशात कोणीही योजना आणल्या नव्हत्या. मोदींनी या जातींसाठी १३ हजार कोटी रुपये खर्च करून कौशल्य विकास कार्यक्रम राबवला, असा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला.
मतदान यंत्रांवरील कमळासमोरील बटण असे दाबा की, त्याचा करंट इटलीपर्यंत गेला पाहिजे, असे म्हणत शाह यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. राजस्थानमधील लोकसभेच्या सर्व २५ जागांवर कमळ फुलणार असून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅटट्रिक मारणार आहेत, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी राजस्थानमधील १२ जागांवर मतदान झाले. तर उर्वरित १३ जागांवर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.