दुचाकी स्लिप झाल्याने एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीवरील तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर-धार रस्त्यावर घडली. राहूल लोटन निकम (वय ३८, रा. कळमसरे ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर भीमराव चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत.

सोमवारी १० ऑक्टोबर रोजी भीमराव चौधरी आणि राहूल निकम हे अमळनेर येथे दुचाकीने आले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघे दुचाकीवरून घरी कळमसरे येथे जाण्यास निघाले. अमळनेर ते धार रस्त्यावरील हॉटेल चिन्मय समोर दुचाकी अचानक स्लीप झाल्याने राहूलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भीमराव चौधरी हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान जखमीस तातडीने धुळे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर राहूल निकमचे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मयत राहुल निकम याची अत्यंत गरिबीची परिस्थिती असून त्याच्या पश्चात आईवडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त कळताच गावात शोककळा पसरली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.