धक्कादायक.. 20 दिवसांच्या बाळाची आईने केली हत्‍या

0

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने 20 दिवसांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चिमुकलीची आई लक्ष्मी भदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

20 दिवसांच्या चिमुकलीची आई लक्ष्मी गजानन भदे (वय 26) ही वाडी अदमपूर येथील रहिवासी असून ती सध्या अमरावती जिल्ह्यातील रामतीर्थ येथे तिच्या भावाकडे मुक्कामी आहे. 7 ऑक्टोबर रोजी चिमुकलीची प्रकृती बरी नसल्याने तिला तिची आई लक्ष्मी भदे व मुलीचा मामा सौरव बरिंगे यांनी उपचारासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलीला पुढील उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र यानंतर या बाळाचा मृत्‍यू झाल्‍याचे समोर आले.

दरम्यान हे प्रकरण पोलिसांकडे गेल्‍यावर पोलिसांनी बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. बाळाचे शवविच्छेदन न्याय सहायक विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. त्यानुसार प्रकरण पुढील तपासासाठी तेल्हारा पोलिसात वर्ग करण्यात आले. त्यानुसार 9 ऑक्टोबरला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू झाला. तेव्हा तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली.

या तपासादरम्यान शवविच्छेदन अहवालानुसार मृत चिमुकलीचा मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले. निष्पाप असलेल्या 20 दिवसांच्या चिमुकलीचा असा अंत झाल्याने कलम 302 अन्वये चिमुकलीची आई लक्ष्मी भदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश धामोडे करीत आहेत. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आजारी असल्याने तिने मुलीची हत्या केल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.