मोठी बातमी.. संजय राऊतांना जामीन मंजूर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. त्यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती.

तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली. मात्र कोर्टाच्या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे.

तसेच, या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. हे छोटंमोठं प्रकरण नाही, मोठी नावं यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे. या आठवड्याचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहे. त्यामुळे किमान या आठवड्याभराची स्थगिती द्यावी. जेणेकरून आम्ही या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं करण्यात आला आहे.

संजय राऊतांवर आरोप ?

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.