युवकांचे मानसशास्त्र : ध्येय निश्चिती… स्मार्ट गोल…

0

लोकशाही विशेष लेख

ध्येय शब्द बनला आहे ‘ध्या’ या धातूपासून. क्रियापदापासून ‘ ध्या’ म्हणजे ज्याचा नेहमी ध्यास घ्यायचा, ज्याचे नेहमी चिंतन करायचे ते. व्यक्तीच्या जीवनात ध्येय हे आत्म्यासारखे व्यक्तीला सतत क्रियाशील ठेवणारे एक विशिष्ट उद्दिष्ट साध्य करायला प्रयत्न अभ्यसकरायला लावणारे असते. एखाद्या व्यक्तीने ध्येय निश्चिती केली की, मग त्याचे अंतर्मन त्याला ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्या सर्व गोष्टी करायला सांगते. व्यक्तीला त्याच्या एकदा का स्वतःच्या क्षमता माहीत पडल्या, त्यावर त्याचा पूर्ण विश्वास दृढ झाला की, मग असाध्य ते काहीच नाही. आपल्याला सर्वांना एकलव्याची गोष्ट माहित आहे. एकलव्याला धनुर्विद्याही शिकायची होती. त्यासाठी तो गुरु म्हणून द्रोणाचार्यांकडे बघायचा, पण परिस्थिती अशी होती की गुरु द्रोणाचार्य त्याला इच्छा असून देखील प्रत्यक्ष धनुर्विद्या शिकवू शकत नव्हते. शेवटी एकलव्याचा दृढ निश्चय असल्या कारणामुळे त्याने घरातच गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून प्रयत्नपूर्वक अखंड सराव करून एक दिवस त्याच्याकडे त्याच्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात अचूकपणे एकाच वेळी सात तीर बसवून त्याचे भुंकणे पूर्णपणे बंद केल्याचे आपल्याला माहित आहे. शेवटी एकलव्याने त्याच्याजवळ असणारा दृढ निश्चय, अखंडपणे निष्ठेने केलेला धनुर्विद्येचा सराव, त्यातून निर्माण झालेल्या आत्मविश्वासाने जगाला दाखवून दिले की, तो देखील एक श्रेष्ठ धनुर्विद्या धरी आहे. ध्येय निश्चिती आणि ते साध्य करण्याची क्रिया प्रक्रिया ही एकलव्य सारखी असावी.

ध्येयाचे जीवनातील महत्त्व

आपण जन्म घेतो त्यामागे निश्चितच विधात्याचा काही विशिष्ट हेतू असतो. जो व्यक्ती जन्म घेऊन काहीच करत नाही त्यासाठी एक म्हण प्रचलित आहे. ‘जन्माला आला हेला आणि पाणी भरून भरून मेला’. व्यक्तीला क्रियाशील, आनंदी, उत्साही आणि दीर्घ आयुष्य जगायला लावण्यासाठी प्रत्येक क्षणाला ध्येय, उद्दिष्ट निश्चितीत ऊर्जा जितकी जास्त तितके ध्येय गाठणे अधिक सोपे. ध्येयामुळे व्यक्तीला कार्य प्रेरणा मिळते. या प्रेरणेतून व्यक्तीला आपल्या अति सूक्ष्म क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करता येतो. व्यक्तीचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, आत्मिक, मानसिक, शैक्षणिक विकास होतो. व्यक्तीच्या अस्तित्वाची त्याच्या कार्यामुळे इतरांना जाण होते. शारीरिक, आर्थिक संपत्तीपेक्षा मौल्यवान संपत्ती म्हणजे ध्येय होय.

काही लोक ध्येय का ठरवत नाही?

युवा मित्रांनो तुमच्या ताटात एका वेळेला खायला नसेल तर त्याने काहीच फरक पडणार नाही. पण तुमच्या डोक्यात आणि तुमच्या जवळ निश्चित असे ध्येय असेल योजना असतील तर तुम्ही त्याच्या जोरावर निश्चितपणे जग जिंकाल. जग्द्ज्जेता सिकंदर घरातून फक्त एक घोडा घेऊन निघाला होता. धीरूभाई अंबानींनी पेट्रोल पंपावर काम करायला सुरुवात करून पुढे जगामध्ये कोट्याधीश उद्योजक म्हणून त्यांची ओळख निर्माण केली. काही व्यक्तींजवळ सर्व काही असतं, पण त्याच्याजवळ ध्येयच नसतं. त्याला त्याच्या स्वतःच्या क्षमतेंची, स्व-कर्तुत्वाची जाणीवच नसते. त्याचा स्वतःवर विश्वासच नसतो. त्याला सतत अपयशाची भीती वाटते, असे व्यक्ती, युवक आयुष्यात त्यांचे ध्येय हे ठरवू शकत नाही.

ध्येयाची निर्मिती कशी होते?

आधी आपल्या अंतर्मनातून सुप्त इच्छेचे प्रकटीकरण होते. या इच्छा का निर्माण होतात? या मागे अनेक मानसशास्त्रीय कारणे आहे. म्हणून आपण चांगल्या इच्छेचे दमन करायला नको. त्या इच्छेला विशिष्ट उद्दिष्टांची आणि आत्मिक निश्चयाचे बळ मिळाले की त्यातून ध्येय निश्चिती होते. त्याचबरोबर व्यक्ती समाज जीवनात वावरत असताना एखाद्या व्यक्तीच्या तदातमी करणातून म्हणजेच आकर्षणातून, सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या प्रेम भावनेमधून तर काही वेळेला अनपेक्षित घटनेमधून व्यक्तीच्या जीवनामध्ये ध्येय निश्चितीची प्रक्रिया होत असते. काही व्यक्तींना अंतरात्म्याच्या आवाजातून अनुभूती आल्यावर उच्च प्रतीच्या ध्येय निश्चिती आणि ध्येय प्राप्ती होत असते. राजमाता जिजाऊ आपल्या तान्हुल्याला म्हणजे, जे पुढे छत्रपती शिवाजी राजे म्हणून सर्व परिचित झाले त्यांना लहानपणीच रामायण, महाभारत, युद्धनीती यांसारख्या कथा ऐकवीत असे. त्यांच्या विचारांमध्ये शिवबाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, प्रशिक्षण, ध्येय हे ठरवून दिले जात असे. मोठ्या ध्येयांची निश्चितीचे बिज रोपण अशा पद्धतीने सतत केले जात असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहे.

ध्येयाचे प्रकार

वैयक्तिक ध्येय : हे ध्येय व्यक्ती केंद्रित असते. त्याचा फायदा हा त्या व्यक्तीपुरता मर्यादित असतो. नोकरी मिळवणे, उद्योग व्यवसाय सुरू करणे इत्यादी..
सामूहिक ध्येय : दोनपेक्षा अधिक व्यक्तींना याचा फायदा होतो. त्यात मग कुटुंब असो किंवा एखादी व्यवस्थापन कंपनी बँक असो ते ठरवतात की, वर्षाच्या शेवटी आपल्याला दहा कोटी फायदा झाला पाहिजे. सामूहिक ध्येय मध्ये ते ध्येय साध्य करण्यामध्ये समूह एकता ही भावना निर्माण होते.
सामाजिक ध्येय : एका विशिष्ट समाजाला त्याचा फायदा होतो. वेगवेगळ्या सामाजिक मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर
राष्ट्रीय ध्येय : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करत भारताला स्वतंत्र मिळवून देणारे क्रांतिवीर विचारवंत, समाज सुधारक त्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रातील नागरिक.
वैश्विक ध्येय : मानवतावादी आणि जन्म कल्याणाच्या दृष्टीने प्रेरित होऊन अशा व्यक्ती कार्यप्रवण होतात. त्यांची ओळख संपूर्ण जगात निर्माण होते. कॉफी अन्नान, मदर तेरेसा, अब्राहम लिंकन, गौतम बुद्ध, थॉमस अल्वा एडिसन, महात्मा गांधी यासारख्या व्यक्ती वैश्विक ध्येयाने प्रेरित झालेल्या होत्या.
आपण ठरवलेले ध्येय ही काही ध्येय दीर्घकालीन साध्य करणारी होणारी असतात. त्यातील काही ध्येयांमधील ध्येय हे मध्यम कालावधीत साध्य होणारी असतात, तर काही ध्येय ही अल्पावधीत काळात साध्य होणारी असतात. समजा लेखक म्हणून प्रामुख्याने आपल्या राज्याचे नामकरण करून त्याला शिवराष्ट्र असे म्हणून ओळखले जावे. हे ध्येय दीर्घकालीन स्वरूपाचे आहे. त्याबाबतच्या सर्व ठिकाणी नोंदी घेणे, या बाबतचे सामूहिक ध्येय साध्य करण्यासाठी किमान दहा वर्ष लागतील, असं गृहीत धरल्यावर त्यासाठी प्रयत्न म्हणून जिल्हाधिकारी शासनाला निवेदन देणे, पत्रकार परिषदा घेणे, त्यातील शॉर्ट टर्म गोल आहे.
त्यानंतर शिवराष्ट्र या नावासाठी समाजात जनजागृती, जन् मन तयार करणे, त्यासाठी प्रत्यक्ष भेटीगाठी मोहीम सुरू करणे, त्याबाबत सतत शासनाकडे पाठपुरावा करणे यासारखे कृती आराखडे मिडल टर्म ध्येयात येतात. अशा पद्धतीने ध्येयांची वर्गवारी करून दहा वर्षानंतर निश्चितपणे आपण सामूहिक ठरवलेले ध्येय आपल्या राज्याचे नामकरण हे शिवराष्ट्र करण्याबाबतचे निश्चितपणे साध्य होईल. पुढील लेखांमध्ये आपण स्मार्ट ॲनॅलिसिस ध्येय ठरवीत असताना ध्येय मार्गातील अडथळे आणि त्यावर मात कशी करायची यावर दृष्टिक्षेप टाकू.

प्रो. डॉ. आशिष एस. जाधव/बडगुजर.
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
9373681376

Leave A Reply

Your email address will not be published.