युवकांचे मानसशास्त्र…स्वॉट (एसडब्ल्यूओटी) ॲनालिसिस..

0

लोकशाही विशेष लेख

युवा मित्रांनो मागील लेखांमध्ये आपण व्यक्तिमत्व करिअर प्रेरणा बुद्धिमत्ता यासारख्या मानसशास्त्रीय संकल्पना बघितल्या. कुठल्याही व्यक्तीला जीवन जगत असताना सर्व स्तरावर यशस्वी व्हायचं असतं. जी व्यक्ती यशस्वी होते तीच व्यक्ती सामाजिक दृष्टिकोनातून स्वीकृत असते. व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याने स्वतःचे विश्लेषण करणेही प्रत्येक टप्प्यात आवश्यक असते. मानसशास्त्रामध्ये त्यासाठी स्वॉट (एसडब्ल्यूओटी) ॲनालिसिस हे शास्त्रशुद्ध तंत्र सांगितले आहे.

स्वॉट ॲनालिसिस या विकास तंत्रामुळे आपल्यातील दुर्गुण आणि सद्गुण आपण शोधू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या यशाच्या मार्गात काय अडचणी अडथळे आहेट, हेही आपण शोधून काढू शकतो. प्रयत्नपूर्वक विचार करून जर आपण अडचणी किंवा अडथळे दूर केले, तर आपल्याला आपले इच्छित ध्येय नक्की गाठता येते. स्वॉट ॲनालिसिस मधील प्रत्येक इंग्रजी मूळ अक्षराच्या माध्यमातून आपल्याला आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करावयाचे आहे. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा ..आज पासून पाच किंवा दहा वर्षानंतर आपणास काय साध्य करायचे आहे? त्यानुसार शॉर्ट तंत्र वापरा. एका कागदावर सदरचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता आपल्यातील बलस्थाने, आपल्यातील कमकुवतपणा, त्यासाठी असणाऱ्या संधी आणि त्यातील धोका यांचे इंग्रजी शब्द स्वॉट याप्रमाणे पुढील प्रमाणे विश्लेषण करा.

समजा तुम्हाला पुढील पाच वर्षात यूपीएससी किंवा एमपीएससी या सारख्या स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनायचे आहे तर मग.
एस (स्ट्रेन्थ) बलस्थाने त्यासाठी आपले सदगुण शोधा. म्हणजेच आपण महत्त्वाकांक्षी प्रामाणिक, नम्र, मेहनती, अभ्यासू, स्वयंप्रेरित, तत्पर, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे, भाषेवर प्रभुत्व असणारे, जिज्ञासू, आनंदी, मनमिळाऊ, नम्र, अज्ञानी, उत्तम निर्णय क्षमता असणारे, चांगले निरीक्षण क्षमता असणारे, न्यायप्रिय, स्वतः स्वच्छता प्रिय, स्वतः विषयी आत्मविश्वास बाळगणारे आहोत का? आपल्या विद्याशाखेतील पदवी यासारखे इतर आपल्यातील जास्तीत जास्त बलस्थाने शोधा, ती एका कागदावर लिहा त्यानंतर..

डब्ल्यू (विकनेस) : कमतरता किंवा कमकुवतपणा
आर्थिक समस्या, तंत्रज्ञानातील अज्ञान, भीती, चिंता, स्वतःला खूप न्यू किंवा श्रेष्ठ समजणे, आपल्या ध्येय प्रती अडथळे आणणारे घटक उदाहरणार्थ नकारात्मक विचार असणारे व्यक्ती, मित्र, शारीरिक मर्यादा, आपली स्वतःची गोंधळलेली अवस्था, व्यसन, शत्रु भाव राखणारा, अति आक्रमक, एकाग्र क्षमतेचा अभाव, लाजरा चौकस वृत्तीचा अभाव, यासारख्या कमकुवत बाबींचा शोध घेऊन त्या आपल्या व्यक्तीमत्त्वाचे बलस्थाने कसे बनतील, याबाबत विचार करून आपल्यातील कमतरता दूर करण्याचे, त्यावर मात करण्याचे नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करा.

ओ (अपोर्चुनिटी) संधी :
जीवनात संधी मिळत राहते. जेव्हा आपल्याकडे संधी आहे, ती फुकट गमवू नका. तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या. त्यासाठी पुढील प्रश्न स्वतःला विचारा. संधीचा शोध आपण कसा घ्यायचा? आपण संधी कशी मिळवायची? संधी मिळवण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले पाहिजे? स्वतःसाठी आपण संधी कशी उपलब्ध करून द्यायला पाहिजे? एक संधी मधून अजून दुसऱ्या इतर कुठल्या संध्या आहेत? संधीचे सोने, सोन्याचे दागिने कसे करायचे?

टी (थ्रेट्स) धोके,आव्हाने अडचणी :
धोके किंवा अडचणी या स्वतःशी संबंधित आणि परिस्थितीजन्य असतात. त्यासाठी आपल्या ध्येयप्राप्तीमध्ये कुठले कुठले धोके अडचणी आहेट, याची यादी तयार करा. त्या अडचणींवर मात कशी करता येईल याबाबत सर्वसमावेशक विचार करून प्रत्यक्ष कृती करून आवश्यकता असल्यास इतरांची त्यासाठी मदत घ्या. अनेक पर्यायांचा विचार करत अडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सकारात्मक दृष्टिकोनातून त्या सोडवा. अडचणी सुटतील धोके कमी होतील.

अशाप्रकारे उपलब्ध परिस्थितीचे अवलोकन करून आपल्याकडे काय चांगले आहे आणि कोणत्या क्षमतांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे, कोणती संधी आहे आणि ध्येय आत्मसात करताना निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. अशा प्रकारे स्वॉट ॲनालिसिस आपल्याला मार्गदर्शक ठरणारे आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे.”सारी शक्ती तुमच्या ठिकाणी आहे. आपल्या सर्व समर्थतेची जाणीव करून कामाला लागा की, विश्व तुमच्या पायाशी लोळण घेईल.”

युवा मित्रांनो स्वॉट ॲनालिसिस हे वापरायचे कसे असा प्रश्न आपणास पडला असेल. याची उपयोगिता ही आपण दैनंदिन जीवनात करीत असलेल्या कामकाजाबाबत आपले छोटे मोठे उद्दिष्ट साध्य करण्याकरता केले जाऊ शकते. या तंत्राचा दररोज वापर आणि सराव करणे हे महत्त्वाचे ठरते.
व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या दरम्यान या स्वॉट तंत्र्याचे प्रशिक्षण हे दिले जाते. त्याचप्रमाणे आपण मुलाखतीला सामोरे जात असताना देखील बऱ्याच तज्ञ व्यक्ती आपणास स्वॉट या तंत्राबाबत विचारणा करतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वॉट हे तंत्र वापरा आणि यशस्वी व्हा…

प्रा. डॉ. आशिष जाधव/बडगुजर
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
9373681376

Leave A Reply

Your email address will not be published.