स्त्रियांचे आरोग्य व आयुर्वेद

0

लोकशाही विशेष लेख

स्त्री निसर्गाची सर्वात सुंदर आणि नवनिर्मिती करु शकणारी रचना आहे. अप्रतिम अद्वितीय अवर्णनीय स्त्रियांचे आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे असते. हे फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सुदृढ असायला हवे. जसं एक स्त्री शिकली की ती संपूर्ण घराला सुशिक्षित बनवते असेच जर स्त्रीचे स्वतःचे आरोग्य चांगले असेल तर ती संपूर्ण कुटुंबाला निरोगी ठेवू शकते. स्त्रीला तिच्या आयुष्यात मुलगी बहीण बायको अशा विविध भूमिकेतून जावे लागते. तसेच प्रत्येकीच्या आयुष्यात विविध टप्पे असतात. जसे की प्युबर्टी (तारुण्य), रिप्रोडक्टिव एज प्रेग्नेंसी, ब्रेस्टफीडिंग, प्रीमेनोपॉझ, मेनोपॉझ, पोस्ट मेनोपॉझ हे सगळे टप्पे असतात. आणि आयुष्याच्या या प्रत्येक टप्प्यावर स्त्री आरोग्याची योग्य काळजी घेतली तर आयुष्य नक्कीच सुखकर होते.

आयुर्वेदाच्या मदतीने हे कार्य खूप चांगल्या पद्धतीने करता येते. आयुर्वेद हे आपले सर्वात प्राचीन असे वेदिक वैद्यकीय शास्त्र आहे. पाच हजार वर्षांपासूनचे शाश्वत असे शास्त्र असून आरोग्याचा इत्यंभूत विचार मांडला आहे. स्वास्थ्य रक्षणाचे आणि व्याधी दूर करण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यासाठी स्त्रीरोग हा संपूर्ण वेगळा विषय यात समाविष्ट आहे. स्त्रियांच्या आयुष्यात मेनार्ची (मासिक पाळी) ते मेनोपॉज असे अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात. प्रत्येक मासिक पाळीच्या आधी व मासिक पाळीच्या काळात बऱ्याच स्त्रियांना काही त्रास होताना आढळतात. आजकाल अनेक स्त्रियांमध्ये पी एम एस म्हणजेच प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजेच अनियमित मासिक रक्तस्राव, एन्डोमेट्रिओसीस इत्यादी विविध आजार त्याचबरोबरीने पीसीओडी, थायरॉईड प्रॉब्लेम हे हार्मोनमुळे होतानाही दिसतात.

बदललेली जीवनशैली, कामाचा वाढता व्याप, ताण तणाव, एकाच वेळी अनेक जबाबदार्‍या पार पाडणे, चुकीचा आहार विहार, कमी झोप नातेसंबंधातील ताण-तणाव इत्यादी सगळ्या गोष्टी या स्त्रियांच्या आजारांसाठी कारणीभूत ठरतात तसेच स्त्रियांना जेव्हा विविध त्रास होत असतात तेव्हा हार्मोन्स बॅलन्स मुळे होणारे पीसीओडी किंवा इतरही अनेक, त्यावेळेला बरेचसे औषध स्त्रिया घेताना दिसतात. त्यामुळे अनेक दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होतात. पण आयुर्वेदिक दृष्टया पाहिलं तर हे त्रिदोष असंतुलन आहेत. म्हणजे वात पित्त कफ हे त्रिदोष आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात सांगितलेले आहेत. त्यांच्या असंतुलनामुळे होताना दिसून येतात या प्रत्येक दोषाचे वेगळं असं कार्य आपल्या शरीरात असतात.

वात जसा हालचाल करण्यासाठी कारणीभूत असतो. पित्त एनेर्जी कन्वर्जन, डायजेशन, बॉडी बिल्डिंग मटेरियल म्हणून ओळखला जातो. तसेच आपल्या शरीरात सात धातू म्हणजे स्ट्रक्चरल युनिट्स ही असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र इत्यादी हे सात धातू आहेत. आपण आहार घेतल्यानंतर त्या आहारापासून सगळ्यात आधी आहाररस तयार होतो व त्यापासून पुढे रसधातू तयार होतो आणि त्यातून पुढे रक्त रक्तातून माणूस असे एकेक करत सातही धातू तयार होत जातात. सगळ्यात पहिले तयार होणारा धातू म्हणजे रसधातू. त्याचा उपधातू म्हणून सांगितला आहे स्तन्य आणि आर्तव म्हणजेच मेंस्ट्रुअल ब्लीडिंग. आपला आहार चांगला असेल तर आपला मेन्स्ट्रुअल ब्लीडींग चांगलं होणार आहे, म्हणजेच चांगले यायला मदत होणार आहे. मी सांगू इच्छिते की मेन्स्ट्रुअलायजेशनला प्रॉब्लेम म्हणून संबोधलं जातं खरं तर हा प्रॉब्लेम नाहीये ही आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. आपल्या शरीराची सिस्टीम क्लीन ठेवण्यासाठी. त्यामुळे प्रॉब्लेम म्हणू नका.

प्रत्येक स्त्रीने आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या प्रकृतीनुसार आहार घेतला पाहिजे. वात पित्त कफ हे दोष संतुलित राहतील असा आहार हवा. बाहेरचे अन्न, बेकरी, आंबवलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, फ्रीजमधले पदार्थ तसेच बटर प्रोसेस फूड, जंक फूड, पिझ्झा, पास्ता, बर्गर इत्यादी सर्व पदार्थ खरंच टाळले पाहिजे. कधीतरी ठीक आहेत पण रोजच्या रोज आहारात हे पदार्थ नको. घरी बनवलेले ताजे गरम अन्न असावे. नोकरी करताना टिफिनमध्ये शक्यतो घरचेच पदार्थ असावेत. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला लवकरच जेवावं. रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नये तर साधारण एक वीस मिनिट तरी चालावे. खरं तर हे नियम घरातल्या सगळ्यांनी पाळायला हवेत. आणि स्त्री संतुलनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर गाईचे दूध तूप लोणी, गाईच्या दुधाचे दही लावून त्यापासून बनवलेले ताक या सगळ्या गोष्टी तिच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.

पीएमएस मध्ये बऱ्याच स्त्रियांना मुलींना अबडॉमिनल पेन होतो. तेव्हा साधा सोपा उपाय म्हणजे तुमच्याकडे असलेले कोणतेही तेल किंवा तिळाचे तेल घेतलं तरी चालेल. त्याचा मसाज करा, थोडा कोमट गरम करून आणि नंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम पाणी बॉटलमध्ये भरून त्याच्याने शेकवा. त्याच्याने पोटदुखी कमी व्हायला खूप मदत होते तसेच हिंग आणि ओवा घालून गरम पाणी तुम्ही पिऊ शकतात. खरं तर पाळी येण्याच्या 8 दिवस आधीपासून जर आपण योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला त्रास जाणवत नाही. साधारण आठ दिवस आधीपासूनच कॅस्टर ओईल रात्री झोपताना एक चमचा गरम पाण्याबरोबर त्यात थोडंसं हिंग घालून घेतलं तर त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. वाताचे अनुलोमन होतं आणि पी एम एस चे लक्षणे कमी होताना दिसतात.

पाळीच्या काळात विश्रांती घेणे खूप आवश्‍यक आहे. शारीरिक आणि मानसिक विश्रांती हवी. आयुर्वेदात काही छानशा वनस्पती सांगितलेले आहेत त्यांचा उपयोग स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप छान होताना दिसतो. शतावरी, अशोक या काही काही वनस्पती आहेत. ज्या स्त्रियांना रक्तस्रावाचा त्रास होतो त्यांनी अशोकारिष्ट लोध्रासव दशमुलारिष्ट यासारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने नक्की घ्यावे. शतावरी कल्प व शतावरी चूर्ण सकाळ-संध्याकाळ दुधातून घेतल्याने ही खूप चांगला फायदा होताना दिसतो. तसेच कुमारी आसव कोरफड यांचा उपयोग तुम्ही करू शकतात. बऱ्याच स्त्रियांना त्रास होतो त्यावेळी पंधरा-वीस काळ्या मनुका रात्री भिजवून सकाळी खाल्ल्या तर त्याचाही चांगला फायदा दिसतो. मेनोपॉजच्या वेळी बऱ्याच स्त्रियांना हॉट फ्लूश, मूड स्विंग, चिडचिड, विनाकारण रडू येणे अशा सगळ्या गोष्टी दिसून येतात. अशावेळी योग्य तो व्यायाम, प्राणायाम, योग निद्रा सारखे उपाय जरूर करावे. त्यामुळे मानसिक संतुलनही साधले जाते आणि त्यामुळे ह्या हार्मोनल इंबॅलन्समुळे जे काही मानसिक त्रास होतात ते कमी होतात. तसेच सगळ्याच स्त्रियांनी अभ्यंग करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे त्वचेचे आरोग्य तर उत्तम राहणारच आहे पण वाताचे संतुलन झाल्यामुळे वात इतर दोषांचाही संतुलन होताना दिसून येते.

तसेच काही विशिष्ट आसन पवन मुक्तासन, भद्रासन, बद्ध कोणासन, शशांकासन, बालासन, हलासन,सूर्य नमस्कार इ. आसने जरूर करावेत. आयुर्वेदात सांगितलेले पंचकर्म जरूर करावे. पंचकर्म हे अथेंतिक वैद्यांकडे जाऊनच करावं फक्त मसाज किंवा शिरोधारा म्हणजे पंचकर्म नव्हे. पंचकर्म हे तुमच्या प्रकृती आणि ऋतूनुसार वैद्य ठरवतात. मग वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण यापैकी जे तुमच्यासाठी गरजेचा आहे ते केलं जातं. हे पंचकर्म म्हणजे संपुर्ण शरीराची शुद्धी असते. त्यामुळे वर्षातून एकदा हे पंचकर्म जरूर करून घ्यावे असे आयुर्वेदात सांगितलेले उपाय आहेत. तसेच आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या हे उपाय आहेत हे केल्यानंतर आपल्या आरोग्याचं रक्षण होत. आपले स्वास्थ्य टिकून राहतं त्यामुळे आयुर्वेद सगळ्यांनी आपल्या जीवनात नक्कीच अवलंब केला पाहिजे.

डॉ. लीना बोरुडे, पुणे
आयुर्वेदाचार्य, पंचकर्म व वैद्यक योग तज्ञ
फोन 9511805298
ईमेल [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.