ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; अभिनव बिंद्रा (नेमबाजी)

0

लोकशाही विशेष लेख 

अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे शिक्षण व मुलभूत प्रशिक्षण हे चंदिगढ येथे झाले. त्यांचे वडील हे एक नामवंत उद्योजक होते. सुरुवातीच्या काळात त्यांचे प्रशिक्षण देहरादून येथील प्रसिद्ध डून स्कूल येथे झाले. टी.व्ही. वरील नेमबाजांना बघून त्यांना या खेळात आवड निर्माण झाली. त्यांच्यात असणारी नेमबाजीची आवड आणि कौशल्य पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातच शुटींग रेंज तयार करून दिली. सुरुवातीच्या काळात त्यांना डॉ. अमित भट्टाचार्य यांनी प्रशिक्षण दिले. त्यांच्या नंतर लेफ्टनंट कर्नल ढिल्लन यांच्याकडे त्यांनी प्रगत प्रशिक्षण घेतले. ते १० मीटर रायफल नेमबाजी या प्रकारात सहभागी होतात.

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी १९९८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणारे ते वयाने सर्वात लहान खेळाडू होते. त्यानंतर लगेचच २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये (Olympics) भारताकडून सहभागी होणारे ते सर्वात कमी वयाचे स्पर्धक ठरले. पुढच्याच वर्षी त्यांनी एकच वर्षात सहा सुवर्ण पदके जिंकण्याचा भीम पराक्रम केला. त्यांनी आतापर्यंत २००० ते २०१६ अशा पाच ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. आपल्या २२ वर्षांच्या क्रीडा प्रवासात त्यांनी आजपर्यंत १५० पेक्षा जास्त पदकांची कमाई केलेली आहे. मात्र या त्यांच्या क्रीडा कारकिर्दीचा सर्वोच्च कळस ठरली ती २००८ बीजिंग ऑलिम्पिक (Beijing Olympics) स्पर्धा. याच स्पर्धेत त्यांनी भारताला सर्वात पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक प्राप्त करून दिले.

भावी खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी रोहित बृजनाथ यांच्या सोबतीने “अ शॉट अॅट हिस्टरी: माय ऑब्सेसिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड” हे आत्मचरित्र लिहिले आणि प्रकाशित केले. या पुस्तकाला वाचक आणि चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, अभिनव बिंद्रा यांना २००० मध्ये अर्जुन पुरस्कार, २००२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न आणि २००९ मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी

जळगाव

७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.