इस्रो अध्यक्षांची जीवनकथा : प्रा. एम. जी. के मेनन

0

लोकशाही विशेष लेख

२८ ऑगस्ट १९२८ रोजी मंगळूरू, कर्नाटक येथे एम. जी. के. मेनन (M. G. K. Menon) (मंबिल्लिकलाथिल गोविंद कुमार मेनन) यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश होते. पंजाब विद्यापीठातून त्यांनी आपले मॅट्रीकचे शिक्षण पूर्ण केले आणि आग्रा विद्यापीठातून ते विज्ञान शाखेतून पदवीधर झाले. एम. जी. के. मेनन यांनी मुंबईच्या रॉयल इन्स्टिटयूट ऑफ सायन्स या संस्थेत भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली, त्या वेळी त्यांना एन. आर. तावडे यांचे मार्गदर्शन लाभले. १९५३ साली ब्रिस्टॉल विद्यापीठातून त्यांनी आपले पीएच.डी चे शिक्षण पूर्ण केले.

१९५५ साली होमी भाभा यांच्या आग्रहास्तव ते टाटा मुलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. १९६६ साली होमी भाभा यांचा विमान अपघातात दुदैवी मृत्यु झाला तेव्हा जेआरडी टाटा यांनी टाटा मुलभुत संस्थेच्या संचालकपदी मेनन यांची नेमणूक केली. त्यावेळी ते केवळ ३८ वर्षांचे होते. १९७५ पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचे दुसरे अध्यक्ष म्हणून १९७२ मध्ये नऊ महिने काम पाहिले.

कोलारच्या खाणीत वैश्विक किरणांचा अभ्यास करून मुलभूत कणांचे गुणधर्म शोधण्याचा जो महत्वाकांशी प्रयोग करण्यात आला त्यात मेनन यांचे मोठे योगदान होते. प्लास्टिकचे बलून तयार करून त्यातून पेलोड सोडण्याची कल्पना त्यांनीच टाटा मुलभूत संशोधन संस्थेत असतांना मांडली होती. या संस्थेत असतांनाच थोर संशोधक सर सी. व्ही. रमण यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे सर सी. व्ही. रमण यांच्या निधनानंतर रामन रिसर्च इन्स्टिट्युटची जबाबदारीही मेनन यांच्यावर आली. १९७४ मध्ये संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७४ ते १९७८ या काळात ते भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि १९८० मध्ये पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून १९८० ते १९८९ या कालावधीत त्यांनी काम पाहिले. तसेच १९८२ ते १९८९ या कालावधीत ते नियोजन आयोगाचे सदस्य देखिल होते. वैज्ञानिक व औदयोगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून १९८९ ते १९९० या दरम्यान मेनन यांनी आपल्या कामाची छाप सोडली. १९९० ते २०१६ या दरम्यान ते कलकत्ता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. प्रा. मेनन भारतातील तिन्ही विज्ञान संस्थेचे फेलो तसेच त्या प्रत्येक संस्थेचे अध्यक्ष असलेले अद्वितीय असे व्यक्तिमत्व होते. तसेच लंडनची रॉयल सोसायटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या संस्थांचे देखिल ते फेलो होते.

१९८९ मध्ये मेनन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री पद भूषवले. १९९० ते १९९६ या कालावधीत ते राज्यसभेचे खासदारही होते. आपल्या संपूर्ण कार्यकाळातील प्रेरणादायी कार्यामुळे एम. जी. के. मेनन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर १९६० सालचा ‘शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार’ तसेच १९६१ साली ‘पद्मश्री’, १९६८ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८५ साली ‘पद्मविभूषण’ हे तिन्ही पद्म पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरवीले गेले.

देशाच्या विज्ञान क्षेत्राच्या धोरणात्मक जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, अणुवैज्ञानिक होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले भौतिक शास्त्रज्ञ, अनेक वैज्ञानिक संस्थांची धूरा स्वतःच्या डोळस नेतृत्वाखाली सांभाळणारे वैज्ञानिक अशी एम.जी.के. मेनन यांची खरी ओळख होती. २२ नोव्हेंबर २०१६ रोजी एम. जी. के. मेनन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.


कु. गायत्री जयश्री शिंदे
केसीई बी.एड. कॉलेज,
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.