डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कार्यातील पंचप्राण

0

वाचन प्रेरणा दिन विशेष 

“झोपल्यावर दिसतात ती स्वप्न नाही.. स्वप्न ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला झोपूच देत नाही..’ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम”, “काही माणसं जन्मताच महान असतात, काही कठीण परिश्रमाने महानता प्राप्त करतात आणि काहींवर महानता लादली जाते.” जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या या वाक्यातील पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत वर्णलेल्या शब्दांना अगदी समर्पक ठरणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.एपीजे अब्दुल कलाम होय. असंख्य स्वप्नांना पंख देणारे, असंख्य युवकांना प्रेरणा देणारे आणि असंख्य कष्टाला यश देणारे व्यक्तिमत्व अशी ओळख डॉ. कलाम यांची करून दिल्यास वावगे ठरणार नाही.

डॉ.कलाम यांचे कार्य नेहमीच देशाप्रती समर्पित राहिले आहे. त्यांच्या कार्याला आणि देशभक्तीला मानवंदना म्हणून ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. डॉ.कलाम यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती परंतु या परिस्थितीचे कोणताही कारण न देता आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर, अत्यंत प्रामाणिकपणे आणि साधेपणाने त्यांनी गगनाची उंची देखील लहान ठरेल असे विशाल अस्तित्व निर्माण केले. डॉ.कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक विद्यार्थी दिन’ म्हणून देखील साजरा केली जाते. या दिनाचे अवचित्त साधून डॉ.कलाम यांच्या कार्यातील पंचप्राण मोजक्या शब्दात मांडत आहे.

१. परंपरा : डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वावर बालपणापासून झालेल्या संस्कारांचा आणि परंपरेचा खूप मोठा प्रभाव हा नेहमीच दिसला आहे. डॉ.कलाम यांचे वडील एका मशिदीमध्ये इमाम म्हणून सेवा देत असे तसेच रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान येणाऱ्या प्रवाशांना आपल्या लहान बोटीतून आणण्याचे कार्य करत होते. त्यांच्या घरातील वातावरण हे नेहमीच धर्मसहिष्णू होते. याचीच फलश्रुती म्हणजे डॉ.कलाम यांच्यावर पडलेला हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्माच्या परंपरेचा व संस्कृतीचा प्रभाव. डॉ. कलाम मशिद आणि रामेश्वरम येथील शिव मंदिरात सातत्याने जात असे असा उल्लेख त्यांनी स्वत: ‘अग्निपंख’ या आत्मचरीत्रातून आणि अनेक मुलाखतीतून देखील केला आला आहे.

 

२. प्रयत्न : आर्थिकदृष्ट्या बिकट असलेली घरची परिस्थिती. चार भाऊ, एक बहिण, आई आणि वडिल असा परिवार. आर्थिक स्थिती भक्कम नसल्याने डॉ.कलाम यांनी वर्तमानपत्र वाटायला सुरवात केली या कार्यात ते आपल्या भावाला मदत करत असे. वाचनाप्रती असेलेल्या त्यांच्या आवडीमुळे वर्तमानपत्र वाटत असतांना ते स्वत: देखील पूर्ण वर्तमानपत्र वाचत असे. डॉ. कलाम यांच्प्रया मनात चंड शिकण्याची प्रचंड इच्छा असूनही शिक्षण घेण्यासाठी उद्भवणाऱ्या अनेक अडचणी या डॉ.कलाम यांच्यापुढे संकट म्हणून उभ्या होत्या. डॉ.कलाम यांचे स्वप्न वैमानिक व्हावे असे होते मात्र त्यांचे हे स्वप्न फक्त एका क्रमांकाने अपूर्ण राहिले.  मात्र कलामांनी आपलं प्रयत्नांचे शस्त्र कधीही टाकले नाही. आय.आय.टी मद्रास येथून पदवी पूर्ण झाल्यानंतर डी.आर.डी.एस. मध्ये त्यांची निवड झाली आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

 

३. पुढाकार : आपल्या कार्याच्या सुरवातीला डॉ.कलाम यांनी हॉवरक्राफ्टचे डिझाईन करून आपल्या कार्याची कुशलता दाखविली. डॉ.कलाम यांना डॉ.विक्रम साराभाई आणि डॉ.ब्रह्मप्रकाश अशा तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनात कार्य करण्याची संधी मिळाली. या दोन्ही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.कलाम यांनी आपल्या कार्याला योग्य दिशा दिली. त्यांच्या दुरदृष्टीमुळे त्यांनी भारतीय बनावटीचे मिसाईल बनविण्याचे तंत्रज्ञान अंगीकृत करून नव्या भारताच्या संशोधन क्षेत्रात मोठी भरारी घेण्यासाठी पुढाकार घेतला. डी.आर.डी.ओ आणि इस्रो यांसारख्या अत्यंत महत्वपूर्ण आणि जबाबदारीच्या अंतराळ विषयक संशोधन संस्थांमध्ये काम करण्याचा देखील त्यांना खूप फायदा झाला. यांनतर ते स्वत: देखील या संस्थांचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडू लागले. नवोदित शास्त्रज्ञांना सोबत घेवून त्यांनी अनेक उपक्रम राबविले. अनेक नवोदित शास्त्रज्ञ घडविण्यात देखील डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा सिंहाचा वाटा आहे.

 

४. प्रगती : आपल्या ज्ञानाचा वापर करून देशातील संरक्षण क्षेत्रात योगदान द्यावा आणि आपल्या राष्ट्राला संरक्षण क्षेत्रात प्रगत व्हावे यांसाठी डॉ.कलाम हे आजीवन कार्यरत होते. डॉ.कलाम यांनी आपल्या प्रयत्नातून जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र विकसित करण्यास सुरवात केली. अणुस्फोट परीक्षण असो की क्षेपणास्त्र प्रक्षेपण डॉ.कलाम यांचे योगदान हे नेहमीच अग्रेसर राहिले आहे. भारतीय बनावटीचे एसएलव्ही, पीएसएलव्ही आणि आयजीएमडीपी तंत्रज्ञान विकसित करून देशांतर्गत क्षेपणास्त्र बनविण्याचे संपूर्ण श्रेय देखील डॉ.कलाम यानां जाते. कोणत्याही राष्ट्रापुढे न झुकता, कोणतीही भिती न बाळगता अण्वस्त्र चाचणी करून भारताला अण्वस्त्रधारी देश अशी ओळख संपूर्ण जगात निर्माण करून देशाला संरक्षण क्षेत्रात प्रगत करण्यास आपले योगदान दिले.

 

५. प्रेरणा : डॉ.कलाम यांचे व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांचे आई-वडील, गुरु आणि वाचनाचे खूप मोठे  योगदान राहिले आहे. देशाप्रती असेलेले त्यांचे प्रेम, निष्ठा आणि अभिमान हा त्यांच्या जिवनातील एक महत्वाचा प्रेरणा देणारा स्त्रोत आहे. कार्यमग्नता, साधेपणा, उच्च विचारसरणी, दुरदृष्टी, तंत्रज्ञानाचा वापर असे अनेक गुण डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाला महान बनवतात. स्वित्झर्लंड हा देश, ज्या दिवशी डॉ. कलाम यांनी त्यांच्या देशाला भेट दिली त्या दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करतो ही बाब देखील डॉ.कलाम यांच्या कार्याची महानता दर्शवते. डॉ.कलाम यांचे विचार त्यांनी स्वत: पुरते मार्यादित न ठेवता येणाऱ्या पिढीला त्यांच्या विचारांची प्रेरणा घेता यावी म्हणून पुस्तकांच्या स्वरूपात सर्वांपुढे मांडली आहे.

डॉ. कलाम हे उत्कृष्ट शास्त्रज्ञ, चांगले शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थीप्रेमी, प्रखर राष्ट्र्भक्त, प्रेमळ व्यक्तीमत्व आणि धर्मसहिष्णू होते असे व्यक्तिमत्व अनेक शतकांमध्ये घडतात आणि त्यांच्या प्रेरणेचा सूर्य देखील अनेक शतकांपर्यंत चमकत असतो. डॉ.कलाम यांच्या जयंतीनिमित्त या लेखाच्या माध्यमाने त्यांच्या कार्याला अभिवादन करून आपण सर्व या व्यक्तिमत्वाच्या कार्यातून प्रेरित व्हाल अशी आशा व्यक्त करतो. तसेच सर्व विद्यार्थ्यांना जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा.

 

– हितेश गोपाल ब्रिजवासी, 

ग्रंथपाल. विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत 

के.ए.के.पी. संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव 

मो. नं: ९६०४००९९९

Leave A Reply

Your email address will not be published.