भाजप महिला पदाधिकाऱ्यांची भेट नाकारल्याने ना. यशोमती ठाकूर यांचा निषेध

0

जळगाव – राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर २७ रोजी  जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्या जिल्हापरिषदेतील आढावा बैठक आटोपून त्यांची भाजपच्या महिला पदाधिकाऱयांनी अत्याचारांसंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केला असता  भेट न झाल्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी  जोरदार निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरूणी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विषयासंदर्भात मंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देण्यासाठी भाजपाच्या महापौर भारती सोनवणे, महानगरपालिका स्थायी समितीच्या माजी सभापती अ‌ॅड. शुचिता हाडा, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे यांच्यासह काही कार्यकर्त्या जिल्हा परिषदेच्या आवारात आल्या होत्या. परंतु, मंत्री यशोमती ठाकूर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना न भेटताच आढावा बैठकीसाठी निघून गेल्या. त्यानंतर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेश द्वारावरच रोखून धरले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी तेथेच निदर्शने करण्यास सुरुवात केली.आमचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते -राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही मंत्री यशोमती ठाकूर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी याठिकाणी आलेलो होतो. मात्र, यशोमती ठाकूर आमचे म्हणणे ऐकून न घेताच, निवेदन न स्वीकारताच आढावा बैठकीसाठी निघून गेल्या. त्या स्वतः महिला आहेत. त्यांनी महिलांवरील अत्याचारासंदर्भात आमचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते. आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, याची प्रचिती आम्हाला पुन्हा एकदा आल्याची भावना भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली . दरम्यान पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगी दिली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.