मुक्ताईंच्या पादुका वाहनानेरवाना होणार, निर्णयाचे स्वागत

0

प्रतिनिधी | मुक्ताईनगर

कोरोनाचे सावट असल्याने आषाढी वारीबाबत अनेक दिवसांपासून वारकऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्यवेळी निर्णय घेत पालखी परंपरा खंडित न करता, पादुका वाहनाने नेण्याचा निर्णय मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांचे बैठकीत शनिवारी दिला. या निर्णयाचे मुक्ताबाई संस्थान व समस्त मुक्ताबाई फडावरील दिंडीकरी वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त केले, तसेच राज्य शासनाचे आभार मानले.

खान्देश, मध्यप्रदेश, विदर्भ व मराठवाड्यातून आषाढीसाठी पंढरपूरला जाणारा मुक्ताईची एकमेव मानाची पालखी आहे. ७५० किमी अंतर ३४ दिवसात पार करून हजारो वारकरी गेल्या ३११ वर्षांपासून एक-दोन वेळेचा अपवाद वगळता अखंडपणे पायीवारी करत आहेत. यंदा कोरोनाचे सावट असल्याने मानाच्या सात पालख्यांना वाहनाने नेवून वारी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. संत निवत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम या सात मानाच्या पालखी सोहळ्यांच्या पादुकांना वाहनाने का होईना, विठ्ठल दर्शन घडवण्याचा निर्णय योग्यच आहे, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली. संत मुक्ताई सर्व वारकऱ्यांच्या वतीने विठोबाचे दर्शन घेतील. त्या परत आल्यावर भाविक मुक्ताईंचे दर्शन घेतील. त्यामुळे वारी पू्र्ण होईल असा आशावाद वारकरी भक्त मंडळी व्यक्त करत आहेत. अशी माहिती संत मुक्ताबाई संस्थान कोथळीचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, दिगंबर महाराज, दिंडीप्रमुख दुर्गादास महाराज नेहते, सखाराम महाराज, दिंडीप्रमुख विश्वंभर महाराज तिजारे, संदीपान महाराज (बऱ्हाणपूर) व वारकरी फडकरी महासंघाने कळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.