” रेडक्राँस व्हाँलेंटीअर्स…. अगेन्स्ट कोविड-19”

0

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात.

दर वर्षी 8 मे हा दिवस संपूर्ण जगात ‘वर्ल्ड रेड क्रॉस डे’म्हणून रेडक्राँसचे आद्य संस्थापक जीन हेनरी ड्यूनेंट यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा केला जातो. सर ड्यूनेंट हे 1901 मध्ये शांततेचा पुरस्कार मिळवणारे पहीली व्यक्ती होते.

वर्ल्ड रेड क्रॉस डे साजरा करण्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे इंटरनेशनल रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट मूवमेंट’ च्या सिद्धांतांना पुष्टी देऊन त्यांचा प्रचार व प्रसार व्हावा. वर्ल्ड रेड क्रॉस डे इंटरनेशनल रेड क्रॉस सोसायटी’चे स्वयंसेवकांच्या सेवाभावी व मानवतावादी कार्याप्रति ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी त्यांना समर्पित केला जातो.
यावर्षीच्या जागतिक रेडक्राँस दिनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इंडियन रेडक्राँस सोसायटीचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे.
आंतरराष्ट्रीय रेडक्राँस सोसायटी ही सन 1863 पासून मानवतावादी सेवाकार्य करणारी जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे. आजमितीला जगातील सुमारे 210 देशांमध्ये जवळपास 10,000शाखा आणि 5 लाखा पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत आहे.1920 मध्ये भारतात रेडक्राँसची स्थापना झाली.आजमितीला देशभरातील 35 पेक्षा राज्ये/संघराज्यात रेडक्राँस च्या शाखा आहेत.देशभरात सुमारे 700 पेक्षा अधिक जिल्ह्रयांमध्ये
रेडक्राँस च्या शाखा कार्यरत आहेत.
या वर्षी वर्ल्ड रेड क्रॉस डे’चं थीम आहे. “KEEP CLAPPING ON
VOLUNTEERS”
कोविड-19च्या आपत्तीने जगभर थैमान घातले आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी रेडक्राँस स्वयंसेवक आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणपणाने अहोरात्र झटताहेत.त्यांच्या या समर्पित कार्याला सलाम करण्यासाठी आज हा दिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात येत आहे.
आपत्ती म्हणजे अशी घटना, ज्या घटनेमुळे जनजीवन विस्कळित होते, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्त हानी होते, निसर्गाचा समतोल बिघडतो व सर्वसामान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने अपूर्ण पडतात.

आपत्ती कधीही सांगून येत नाही. ती चोरपावलांनी येते ,आणि मोठ्याप्रमाणात जीवितहानी व वित्तहानी करून जाते. अशा अचानक येणाऱ्या आपत्तींचा समर्थपणे सामना करण्यासाठी, अशा आपत्तीत सहजपणे बळी पडणाऱ्या समाजातील घटकांचे(ज्येष्ठ नागरिक, महीला, लहान मुले, आजारी, निराधार, विस्थापित व्यक्ती इ.)संरक्षण करण्यासाठी आपत्तीची पूर्वतयारी, आपत्तीचा संघर्ष करण्यासाठी व आपत्तीतून सावरण्यासाठी रेडक्राँसने आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचाराचे शास्रीय प्रशिक्षण देऊन तयार केलेले स्वयंसेवक म्हणजे “रेडक्राँस स्वयंसेवक…आपत्तीच्या वेळी तसेच शांतताकाळात रेडक्राँस अनेकविध सेवाभावी,
मानवतावादी उपक्रम राबवित असते.

जळगाव जिल्ह्यात देखिल रेडक्राँसची जिल्हा शाखा सन 1953 पासून कार्यरत आहे. अनेक समाजोपयोगी, सेवाभावी व मानवतावादी उपक्रम जिल्हा शाखेमार्फत राबविले जातात.
हे सर्व उपक्रम राबविण्यात सर्वात मोठे योगदान स्वयंसेवकांचे आहे. त्यासाठी सर्वप्रकारच्या आपत्तींच्यावेळी, मग अशा आपत्ती मानवनिर्मित असो वा निसर्ग निर्मित त्यांचा संघठीतपणाने सुयोग्यरित्या मुकाबला करण्यासाठी पूर्वप्रशिक्षित स्वयंसेवकांचा एक गट सदैव तत्पर आहेत.जिल्हा शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली असे प्रशिक्षित स्वयंसेवक तयार करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.गनी मेमन, मानद सचीव श्री. विनोद बियाणी, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव श्री. राजेश यावलकर, श्री.धनंजय जकातदार व सुभाष सांखला यांनी प्रोत्साहित केले.
सेंट जाँन अँम्ब्यूलन्स, नवीदिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षित प्रशिक्षक डॉ. विजय चौधरी, घन:शाम महाजन, डॉ. श्रध्दा माळी, जगदीश पाटील, आर.सी.पाटील, डॉ. श्रेयस महाजन, उज्वला वर्मा, अश्वजीत घरडे, महाराष्ट्र राज्य शाखेचे डॉ. विकास कुरणे यांनी या स्वयंसेवकांना शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली.

आजमितीला रेडक्राँसकडे अशा 70 ते 75 प्रशिक्षित स्वयंसेवकांचा गट सर्व सामर्थ्यानिशी कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहे.
त्यामध्ये डाँक्टर्स, विद्यार्थी, शिक्षक, औद्योगिक क्षेत्रात काम करीत असलेले कामगार, सर्पमित्र, पट्टीचे पोहणारे, कुशल तंत्रज्ञान असलेले तंत्रज्ञ,होमगार्ड, लहान मोठे व्यावसायिक,इंजिनिअर, बांधकाम व्यावसायिक,संस्थेचे पदाधिकारी, तांत्रिक व निमवैद्यकिय कर्मचारी इ.चा समावेश आहे.कोणत्याही स्वरूपाच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी हे स्वयंसेवक सदैव तत्पर असतात.
सर्व “रेडक्राँस स्वयंसेवक” आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून या “रेडक्राँस स्वयंसेवकां”चे सेवा कार्य अखंडपणे सुरू आहे.

कोरोना मुळे भयभीत झालेल्या सामान्य जनतेला धीर देऊन कोरोनाचा सामना करण्यासाठी काय करावे काय करू नये याबाबत सविस्तर माहिती देऊन ते जनजागृती करीत आहेत. त्यामध्ये सँनिटायझरच्या वापराचे महत्व, हात धुण्याची शास्त्रोक्त पद्धत,मास्कचा वापर व त्याचे व्यवस्थापन,घरात,समाजात किंवा बाहेर वावरतांना सुरक्षित अंतर ठेवण्याबाबतची काळजी,कम्युनिटी किचनच्या माध्यमातून निराधार, निराश्रित व गरजू लोकांना जेवणाची पाकिटे पोहचवणे इ.कामे स्वयंस्फूर्तीने करताहेत.

कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी रेडक्राँसमार्फत अनेकविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचे अंमलबजावणीसाठी “रेडक्राँस स्वयंसेवकां”चे योगदान खूपच मोलाचे आहे.

आपत्कालीन परीस्थितीत गरजू रूग्णांना तसेच दिव्यांग,व्यक्ती, यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रक्तपिशवी किंवा औषधी पोहचवणे,फिरत्या दवाखान्यात रुग्णांना उपचारादरम्यान मदत करणे, त्यांना औषधी देणे, विस्थापित, निराधार व गरजू नागरिकांना जेवणाची पाकिटे वाटप करणे, कम्युनिटी किचनमध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी मदत करणे,भाजी व फळविक्रेत्यांच्या आरोग्य तपासणी कामी वैद्यकीय पथकातील डॉक्टरांना मदत करणे, आरोग्य , स्वच्छता कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना प्रतिकार शक्तीवर्धक औषधांचे वाटप करणे यासारख्या अनेक कामांमध्ये हे “रेडक्राँस स्वयंसेवक ” अत्यंत उत्साहाने, स्वयंप्रेरणेने व निरपेक्षपणे काम करताहेत. वेळ,काळ,तहान भूक याची पर्वा न करता या स्वयंसेवकांनी स्वतःला झोकून दिले आहे.

सगळ्यांच्या नावाचा याठिकाणी उल्लेख करता येणार नाही. परंतू काही स्वयंसेवकांचा नामोल्लेख न करणे हे त्यांच्यावर किंवा ते करीत असलेल्या कामावर अन्याय केल्यासारखे होईल.त्यामध्ये जगदीश पाटील, संजय सोनवणे, भरत बारी, अश्वजित घरडे, गुरूप्रसाद पाटील, भगवान चौधरी, बंटी बारी, तीर्थराज पाटील, देवेंद्र भावसार लोकेश माचरेकर, तेजस नेतले,विनोद लवणे, अनिल पाटील, भावेश कोठावदे, युवराज भोई, राकेश भामरे, कांतीलाल इंगळे, किशोर भावसार, स्वरूप सोनवणे, मयुरेश चौधरी, पवन फडके, चेतन इंगळे, रमेश बारी, ,योगेश राणा, प्रकाश चव्हाण, राजेंद्र बारी, सागर शिंदे, मुकेश चौधरी, यश सोनवणे, सुधीर सोनार, गौरव दुसाने, मयूर येवले, हितेंद्र पाटील, यांच्या नावाचा व ते करीत असलेल्या सेवाभावी कामाचा आवर्जून उल्लेख करणे आवश्यक आहे.

आपत्तीचा स्विकार आपण जेवढ्या लवकर करू तेवढी आपत्तीची तीव्रता कमी होते. आपत्ती हे संकट न मानता समाजकार्य करण्यासाठी मिळालेली ती एक संधी आहे या सकारात्मक भावनेने ती स्विकारुन गेल्या दोन महीन्यापासून हे स्वयंसेवक एकदीलाने व एकजुटीने काम करताहेत. त्यामुळे त्यांच्या कामातील सांघिक भावना, सकारात्मकता,सेवाव्रत, अखंडता, आत्मविश्वास, कर्तव्यपरायणता,शिस्त समाजाप्रती असलेली बांधिलकी,उत्तरदायित्व इ.बाबी यानिमित्ताने या “स्वयंसेवकांच्या” कार्यातून समोर आल्यात.

काळरात्र संपल्यानंतर मंगलमय पहाट उजाडणारच आहे.तसंच कोरोना जागतिक महामारीचं संकट केव्हातरी तरी संपणारच आहे. हाच आशेचा किरण रेडक्राँस समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांच्या सेवाभावी कार्यातून पोहचविण्याचे काम करताहेत.त्यांचे कार्य समाजमनापर्यंत पोचविण्याचा एक अल्पसा प्रयत्न…. त्यांच्या सेवाकार्याला लाख लाख प्रणाम……

लेखांकन
– जी.टी.महाजन
(लेखक हे रेडक्राँसचे संचालक असून आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार चे मास्टर ट्रेनर आहेत.)

Leave A Reply

Your email address will not be published.