हा तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच !

0

ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरुन शाळेला ने-आण करणाऱ्या रिक्षाला अपघात होवून विद्यार्थी जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या घटना ताज्या असताना जळगाव शहरामध्ये एका ट्रकमध्ये 70 ते 80 शालेय विद्यार्थ्यांना कोंबून 18 किमी अंतरावर असलेल्या गाडेगाव येथे वृक्षारोपणासाठी नेण्यात आले. वृक्षारोपणाबाबत जागृती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी. हा यामागचा उद्देश जरी चांगला असला तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे नेण्याची व्यवस्था करणे हे संबंधित संयोजकाचे कर्तव्य होते. त्याचबरोबर शाळेच्या शिक्षकवृंदाची तसेच शालेय व्यवस्थापनाची जबाबदारी असते. वृक्षारोपणाचा उद्देश चांगला आहे म्हणून त्याच्या योग्य नियोजनाकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण मालवाहू ट्रकमध्ये मेंढ्यांसारखे कोंबून विद्यार्थ्यांना भरले गेले. त्यांना बसायलासुद्धा जागा नव्हती. 18 किमीचा प्रवास सर्व विद्यार्थ्यांनी दाटीवाटीत उभे राहूनच केला. ट्रकमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे हीच मुळात अवैध वाहतूक होय. त्यामुळे संबंधित खात्यांतर्फे या ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करायला हवी होती. ती का केली गेली नाही? याचा जाब संबंधित खात्याला विचारणे गरजेचे आहे. एखाद्या सर्वसामान्य गरिबाच्या लग्नासाठी जेव्हा ट्रकमधून वऱ्हाडी जातात तेव्हा पोलीस खाते त्यांचेवर कारवाई करते, दंड वसुल करते. तो ट्रक जप्त करण्यापर्यंत कारवाई होते. इथे कानाडोळा करण्याचे कारण काय? दुर्दैवाने त्या ट्रकचा अपघात झाला असता तर त्यावेळेला त्याची कोणी जबाबदारी घेतली असती?

जळगाव शहरातील नामांकित अशा खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ओरिएन इंग्लिश स्कुलमधील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 वाजता घरुन शाळेत बोलाविण्यात आले. त्यांना गाडेगाव येथे नेण्यासाठी 3-4 मालवाहू ट्रक बोलाविण्यात आले. त्या ट्रकमध्ये मेंढ्यांसारखे एका ट्रकमधून 70-80 विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले. त्यांना तेथे दिवसभर वृक्षारोपण करवून संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळेच्या पटांगणावर आणले गेले. तेथे विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यांना घेण्यासाठी आले असता हा प्रकार पाहून ते आवाक्‌ झाले. काही अघटीत घडले असते तर या कल्पनेने पालक सुन्न झाले होते. पालकांनी शिक्षकांना याबद्दल जाब विचारला असता त्यांना त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या ओरिएन शाळेच्या मुख्याध्यापकांनी जो खुलासा केलाय आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ती हास्यास्पद म्हणावी लागेल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेऊन एक पालक नाहक प्रश्‍न उपस्थित करीत होते. हा मुख्याध्यापक संदीप साठे यांचा खुलासा त्यांच्या पदाला शोभणारा नाही. बरे विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये मेंढ्यांसारखे कोंबून दिले आणि शिक्षक मात्र चालकांच्या केबीनमध्ये ऐश आरामात बसले. हा प्रकार तर अत्यंत चुकीचा आहे. शिक्षक जर विद्यार्थ्यांबरोबरच राहिले असते. तर विद्यार्थ्यांविषयी शिक्षकांना प्रेम असल्याचे स्पष्ट दिसून आले असते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये हा दुजाभाव कशासाठी? विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर्श काय घ्यावा? असे अनेक प्रश्‍न शाळेचे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांचेसंदर्भात उपस्थित होऊ शकतात. या संदर्भात सदर खान्देश कॉलेज एज्युकेशनचे जनसंपर्क अधिकारी केदार यांनी वृत्तपत्रांशी बोलताना जो खुलासा केलाय तो खुलासा म्हणजे त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. या विद्यार्थ्यांना ट्रकमधून वृक्षारोपणाला नेणे- आणणे याच्याशी शैक्षणिक संस्थेचा काहीही संबंध नाही. ही योजना केंद्र शासनाची होती. केंद्र शासनाच्या वतीनेच हे सर्व केले गेले आहे. केंद्र शासनाची योजना होती. म्हटले तर सोयीस्करपणे हात झटकता येणार नाही. केंद्र शासनातर्फे नेण्याची योजना होती काय? शासनाचे नाव घेतले की, आपण सहीसलामत सुटू शकतो, असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. केंद्र शासन कायदा मोडायला शिकवत नाही. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करायला सांगते.
त्यामुळे मालवाहू ट्रकमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणे म्हणजे ही अवैध वाहतूकच होय. त्यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओतर्फे या ट्रकचालक मालकांवर कारवाई झालीच पाहिजे. शिक्षण संस्था आणि शाळेचे शिक्षण संस्था व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांचा चॉपरसारख्या तीक्ष्ण शस्त्राने नुकताच खून झाला. संस्थेचे व्यवस्थापन नीटपणे करणे जमत नसेल तर त्यातून बाजूला होणे चांगले. मू. जे. महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळविण्यासाठी धडपड कशासाठी करताय? एकंदरीत विद्यार्थ्यांची ही अवैध वाहतूक हा प्रश्‍न गंभीर असून त्याबद्दल संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.