जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बोरनेर तांडा ( ता. सोयगाव जि.जळगाव ) येथे केळी खरेदी करून ग्रामसेवकासह 14 शेतकऱ्यांची 35 लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी 2021 मध्ये तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या ग्रामसेवकावर निलंबनाची व शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर जळगाव पोलिस अधीक्षकांच्या पत्रानुसार औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली.
जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांना पत्र दिले. ग्रामसेवक निकम याने केळी पिकाची खरेदी करुन त्याचा मोबदला न देता 35 लाखावर फसवणूक केली आहे. 14 शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नसल्याचा पुरावा मिळून आलेला असल्याने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. ग्रामसेवकाने खासगी व्यवसाय करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियमांचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्याला ग्रामसेवक पदावरुन निलंबीत करण्यात आलेले आहे. तसेच शिस्तभंगविषयक कारवाई तत्काळ सुरु करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.
महेंद्र सीताराम निकम असे त्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. गुन्हा घडला त्यावेळी तो सोयगाव तालुक्यातील बोरनार तांडा येथे कार्यरत होता. सद्यस्थितीत सिल्लोड तालुक्यातील चारनेर येथे कार्यरत आहे. तो मुळचा पाचोरा तालुक्यातील जारगावचा रहिवासी आहे. जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील शेतकरी सुधीर मधुकर चौधरी यांनी 4 ऑगस्ट 2021 रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली होती. त्यानुसार जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील 14 शेतकऱ्यांची केळी खरेदी करुन त्यांना 35 लाख 24 हजार 724 रुपयांचा मोबदला देण्यात आलेला नव्हता. या प्रकरणी ग्रामसेवक निकम व अशोक रघुनाथ पाटील रा.निंभोरा ता.रावेर या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांपैकी डॉ.किशोर सोनवणे यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे ग्रामसेवक निकम याच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदने दिली. त्यावर कारवाई न झाल्याने स्मरणपत्रही देण्यात आले होते.