भाजप शिवसेना अखेर युती

0

मुंबई :

सत्तेत राहून सतत भाजपवर शरसंधान करणाऱ्या आणि यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेने अखेर पुन्हा एकदा भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २३ जागा शिवसेना तर २५ जागा भाजप लढेल. विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाजप मित्रपक्षांशी चर्चा करेल. त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यात शिवसेना-भाजप निम्म्या-निम्म्या जागांवर लढेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजप हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये २५ वर्षांपासून युती असून काही मतभेद असले तरी आमचा मूळ विचार सारखा राहिलेला आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा एकदिलाने एकत्र येत आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काही कारणाने आम्ही एकत्र राहू शकलो नाही. त्यानंतर साडेचार वर्षे आम्ही एकत्रपणे सरकार चालवतो आहोत. आता काही पक्ष एकत्र येऊन राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत असताना हे आव्हान परतवून लावण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सत्ता, पदे यापुरती ही युती मर्यादित नसून त्यापलीकडे जाऊन व्यापक देशहित डोळ्यापुढे ठेऊन ही युती झाली आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी अनेक मुद्दे मांडले. शेतकरी, सामान्य माणसं, गरिबांचं हित जपण्याचा त्यांचा आग्रह राहिला. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी, ही त्यांची मागणी होती. या मागणीचे पूर्ण समर्थन भाजप करत आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने आधीच अयोध्येतील अविवादित ६३ एकर जमीन मंदिर न्यासाला देण्याचा निर्णय घेऊन मंदिराचा मार्ग सुकर केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.