हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली

0

नागपूर: एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न झाला होता. दरम्यान, या तरुणीची प्रकृती खालावली असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. पीडितेचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असून सध्या या तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे.

आज या पीडितेवर एक अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. मात्र, पीडितेची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया आज न करता ती उद्या किंवा योग्य वेळी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीडितेचा गुरुवारी रक्तदाब वाढला होता. त्यानंतर जंतूसंसर्गाचा धोका लक्षात घेता ऑरेंज सिटी रुग्णालयाने अतिदक्षता विभागातील सर्व ७ रुग्णांना इतरत्र हलविले होते. या ठिकाणी केवळ एकट्या पीडितेलाच ठेवण्यात आले आहे. हा वॉर्ड जळीत प्रकरणातील पिडीत तरुणीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी तिचा रक्तदाब स्थिर झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या घडामोडीत भाजलेल्या तिच्या शरीरावरी जखमांचेही निर्जंतूकीकरण करण्यात आले. सोबतच या तरुणीच्या जखमांवरही ड्रेसिंग रोज बदलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.