स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आठ शहरांमध्ये17 प्रकल्प पूर्ण

0

नागपूर – कमलाकर वाणी
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राज्यातील निवड झालेल्या आठ शहरांमध्ये 285 प्रकल्प कार्यान्वित करायचे आहेत, त्यापैकी 17 प्रकल्प पूर्ण झाले असून 29 प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. तर नऊ प्रकल्प निविदा प्रक्रियेत आहेत. उर्वरित प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्यातील दहा संभाव्य शहरांपैकी आठ शहरांची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झाली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक स्मार्ट सिटीसाठी विशेष उद्देश वहनाचे (एसपीव्ही) गठन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत निवड झालेल्या आठ शहरांत 285 प्रकल्प कार्यान्वित करायचे असून त्यासाठी 19 हजार 456 कोटी रुपयांचा खर्च निश्‍चित करण्यात आला आहे. आतापर्यंत 199 कोटी रुपये किंमतीचे 17 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 1045 कोटी रुपयांच्या 29 प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत, तर 696 कोटी रुपयांचे नऊ प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया सुरु आहेत.
या आठ शहरांना केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 8 हजार कोटी इतका निधी अभियान काळात उपलब्ध होणार आहे. या योजनेतील प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना एसपीव्ही यांना देण्यात आल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.